Join us  

टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक का व्हायचंय? जाँटी ऱ्होड्सनं सांगितलं कारण

भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सनं अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 2:42 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सनं अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकासह, अन्य पदांसाठी काही दिवसांपूर्वी अर्ज मागवले होते. त्याचवेळी सध्या कार्यरत असलेले प्रशिक्षकही पुन्हा अर्ज करू शकतात आणि त्यांनाच संधी मिळू शकते, अशी चर्चाही रंगली होती. पण, जाँटीच्या एन्ट्रीनं या प्रक्रियेत नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. भारतीय संघाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक का व्हायचे आहे, याचे कारणही जाँटीनं स्पष्ट केलं.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर रवी शास्त्री आहेत, शिवाय संजय बांगर हे फलंदाज प्रशिक्षक, भरत अरुण हे गोलंदाज प्रशिक्षक आणि आर श्रीधर हे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच या सर्वांचा कार्यकाळ होता, परंतु आगामी वेस्ट इंडिज दौरा लक्षात घेता त्यांचा करार 45 दिवसांना वाढवण्यात आला आहे. बीसीसीआयनंही जाँटीनं अर्ज केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जाँटीकडे कोणत्याही राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही, तरीही मुंबई इंडियन्ससोबतच्या 9 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर तो या पदासाठी पात्र ठरतो. ''ऱ्होड्सकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा अनुभव नाही, परंतु तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत गेली नऊ वर्षे काम करत आहे. नियमानुसार तो या पदासाठी पात्र ठरत आहे,''असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

क्षेत्ररक्षणात भारतीय संघाला अव्वल बनवण्याचा निर्धार''भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार आहे. या संघाने गेल्या तीन वर्षांत अनेक यशोशिखर पादाक्रांत केली आहेत आणि त्यांच्या या कामगिरीचा मी आदर करतो. पण, विराट सेनेला केवळ झेल कमी सोडणारा संघ अशी ओळख द्यायची नाही, तर कमी संधीतही सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ अशी ओळख तयार करायची आहे,'' असे जाँटीनं सांगितले.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्याची तयारी करत आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. 

टॅग्स :बीसीसीआय