Join us  

Jos Buttler, IPL Final 2022 GT vs RR: जोस बटलर तुफान फॉर्मात; डेव्हिड वॉर्नरचा मोठा विक्रम धोक्यात

गुजरात पहिल्यांदा तर राजस्थान दुसऱ्यांदा खेळणार IPL फायनल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 3:45 PM

Open in App

Jos Buttler, IPL Final 2022 GT vs RR: यंदाच्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. गुजरात टायटन्स ने आपल्या पहिल्याच हंगामात फायनल पर्यंत मजल मारली आहे. तर राजस्थानने देखील २००८च्या विजेतेपदानंतर पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ बाजी मारणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. गुजरातने क्वालिफायर-१ मध्ये राजस्थानला पराभूत केले होते. पण नुकत्याच झालेल्या क्वालिफायर-२ मध्ये राजस्थानच्या जोस बटलरने तुफानी खेळी करून दाखवली. आज रंगणाऱ्या फायनलमध्ये बटलरकडे डेव्हिड वॉर्नरचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.

जोस बटलरने क्वालिफायर-२ च्या सामन्यात बंगलोर विरूद्ध १०६ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीतील वॉर्नरचा एक विक्रम त्याने मोडला. प्ले-ऑफच्या फेरीत १९० धावांचा वॉर्नरचा विक्रम होता. बटलरने १९४ धावा केल्या. मात्र वॉर्नरचा आणखी एक मोठा विक्रम बटरलच्या दृष्टीपथात आहे. जोस बटलरला वॉर्नरचा तो मोठा विक्रम तोडण्यासाठी २५ धावांची आवश्यकता आहे. वॉर्नरने IPL 2016 मध्ये हैदराबाद संघाकडून खेळताना एका हंगामात ८४८ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्याची संधी बटलरकडे आहे.

दरम्यान, आज अंतिम सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. जर खराब हवामानमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला तर सामना हा रात्री १०.१० वाजता सुरू होऊ शकतो. तसेच जर सामना दोन तास उशिरा सुरू झाला तरी षटकांमध्ये कपात केली जाणार नाही. जर काही कारणाने अंतिम सामना ५-५ षटकांचा करण्यात आल्यास रात्री १२.२६ पर्यंत सामना सुरू करावा लागेल. तसेच खराब हवामानामुळे सामन्यात एकही चेंडू फेकला गेला नाही, तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. नव्या नियमानुसार पावसामुळे जर आयपीएल २०२२ चा अंतिम सामना मध्येच थांबवावा लागला, तर दुसऱ्या दिवशी खेळ जिथे थांबला होता तिथूनच पुढील खेळाला सुरुवात होईल. तसेच नाणेफेकीनंतर खेळ थांबला आणि एकाही चेंडूचा खेळ झाला नाही तर राखीव दिवशी पुन्हा एकदा नाणेफेक घेतली जाईल. तसेच राखीव दिवशी पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच पावसामुळे सुपर ओव्हर खेळवता आली नाही तर मग गुणतक्त्यातील क्रमवारीनुसार विजेत्या संघाची घोषणा होईल. म्हणजेच गुणतक्त्यात पुढे असलेला गुजरातचा संघ विजेता ठरेल.

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलरराजस्थान रॉयल्सडेव्हिड वॉर्नर
Open in App