लंडन : इंग्लंडच्याजोस बटलरने आपला आयपीएलमधला फॉर्मात कायम राखला राखत पाकिस्तानच्या गोलंदाजांना धु... धु... धुतल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बटलरने ५५ चेंडूंत ९ षटकारांच्या मदतीने नाबाद ११० धावांची तुफानी खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. या खेळीचे वैशिष्ट्य नेमके काय होते, ते जाणून घ्या.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी यावेळी दमदार सुरुवात केली आणि संघाला शतकी सलामी करून दिली. बटलर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडची ३५.१ षटकांत ३ बाद २११ अशी स्थिती होती.
बटलरने खेळपट्टीवर आल्यापासूनच गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बटलरला यावेळी कर्णधार इऑन मॉर्गनची चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. बटलरने यावेळी झंझावाती फलंदाजी करत ५५ चेंडूंत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या जोरावर नाबाद ११० धावांची खेळी साकारली. मॉर्गनने ४८ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ७१ धावा केल्या.