Jos Buttler Unique Six Video: IPL नंतर आता इंग्लिश फलंदाज जोस बटलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमक दाखवत आहे. बटलरने नेदरलँड्स विरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने नेदरलँड्सचा आठ विकेट्स राखून पराभव करत मालिका ३-० अशी खिशात घातली. बटलरने या स्फोटक खेळीत सात चौकारांसह पाच षटकार ठोकले. या दरम्यान त्याने आपल्या बॅटने एक विचित्र फटकाही खेळला. त्याच्या अजबगजब फटक्याने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. बटलरने चक्क दोन टप्पा बॉलवर षटकार खेचला.
इंग्लंडच्या डावाच्या २९व्या षटकात हा विचित्र प्रकार घडला. त्या षटकात वेगवान गोलंदाज पॉल व्हॅन मेकरेनचा पाचवा चेंडू हातून सुटला. चेंडू २ टप्पा पडून बटलरपर्यंत पोहोचला. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर लेग साइडला होता पण बटलरने हा चेंडू सोडला असता तर केवळ नो बॉल ठरला असता. त्यामुळे बटलरने हा चेंडू फाइन लेगवर मारला आणि षटकार मिळवला. तसेच, पुढच्या फ्री हिटवर देखील बटलरने गगनचुंबी षटकार ठोकला.
जोस बटलरचा विचित्र सिक्सर-
बटलर ठरला मालिकावीर
जोस बटलर नेदरलँड्स विरुद्धच्या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने दोन डावात एकूण २४८ धावा केल्या. या दरम्यान त्याने १४ चौकार आणि १९ षटकार मारले. IPL 2022 मध्ये, बटलरने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप मिळवली होती. बटलरने १७ सामन्यात ५७.५३ च्या सरासरीने ८६३ धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११६ धावा होती. बटलरने या काळात चार शतके आणि ४ अर्धशतके झळकावली.