Jos Buttler Records, IPL 2024 RCB vs RR: यंदाच्या IPL मध्ये राजस्थानचा संघ विजयरथावर स्वार झाला आहे तर पराभव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. राजस्थानच्या संघाने चाप पैकी चारही सामने जिंकत ८ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. याउलट बंगळुरूचा संघ ५ पैकी ४ सामने गमावून केवळ २ गुणांवरच आहे. शनिवारच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने दमदार शतक (७२ चेंडूत नाबाद ११३) ठोकून RCBला १८३ पर्यंत मजल मारून दिली होती. पण जोश बटलरच्या प्रत्युत्तरातील शतकाने (५८ चेंडूत नाबाद १००) राजस्थानला विजय मिळवून दिला. जोश बटलरने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्यासोबतच त्याने आपल्या १००व्या सामन्यात ५ महत्त्वाचे पराक्रम केले.
बटलरचे ५ पराक्रम
1. IPL मध्ये आतापर्यंत केवळ 3 खेळाडूंना 6 किंवा त्यापेक्षा जास्त शतके ठोकता आली आहेत. त्यात बटलरने 100 व्या सामन्यात पण 99व्या डावात 6वे शतक साकारले, त्यामुळे त्याने विराट आणि ख्रिस गेल पेक्षा जलद 6 शतके केली.
2. IPL मध्ये धावांचा पाठलाग करताना जोश बटलर ने दुसरे शतक ठोकले. त्यामुळे त्याने विराट आणि बेन स्टोक्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
3. आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकणारा बटलर केल राहुल नंतर दुसरा खेळाडू ठरला.
4. एका संघासाठी सर्वाधिक 11 वेळा सामनावीराचा किताब जिंकण्याचा विक्रम बटलर ने केला. त्याने अजिंक्य रहाणे चा विक्रम मोडला.
5. आयपीएल इतिहासात वेगवेगळ्या मैदानावर पाच किंवा त्यापेक्षा जास्त शतके बटलर हा एकमेव खेळाडू ठरला.
दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस या दोघांनी बंगळुरू संघाला दमदार सलामी मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. १४व्या षटकापर्यंत सलामी जोडी तळ ठोकून होती. पण फाफ डु प्लेसिसला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तो ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर मॅक्सवेल १, सौरव चौहान ९ आणि कॅमेरॉन ग्रीन नाबाद ५ यांना फारशी चमक दाखवता आली नाही. विराटने मात्र शेवटपर्यंत खिंड लढवत ७२ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ११३ धावा केल्या.
१८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना राजस्थानच्या संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. पण संजू सॅमसन आणि जोश बटलर जोडीने १४८ धावांची भागीदारी करून सामन्यात रंग भरला. संजू सॅमसन ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावा काढून माघारी परतला. जोश बटलरने खेळपट्टी सोडली नाही. रियान पराग (४), ध्रुव जुरेल (२) आणि शिमरॉन हेटमायर (नाबाद ११) यांच्या साथीने बटलरने संघाला विजय मिळवून दिला. बटलरने ५८ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. त्यालाच सामनावीरही घोषित करण्यात आले.
Web Title: Jos Buttler scripts 5 big records in IPL 2024 century in 100th match RCB vs RR Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.