नवी दिल्ली-
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या जवळपास पावणे तीन वर्षांपासून विराट कोहलीच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालेलं नाही. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडेतही कोहली केवळ १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा कोहलीवर टीका सुरू झाली आहे.
एका बाजूला कोहलीवर टीकांचा भडीमार सुरू असताना सहकारी खेळाडू खंबीरपणे कोहलीच्या पाठिशी उभे राहिले आहेत. इतकंच काय तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीही आता कोहलीला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानंही कोहलीवर टीका करणाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. विराट कोहली इतका मोठा खेळाडू आहे आणि काही सामन्यांमध्ये त्यानं धावा केल्या नाहीत तर तुम्ही असा त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करू शकत नाही, असं जोस बटलरनं म्हटलं आहे.
"विराट कोहली देखील एक माणूस आहे आणि त्याच्याकडूनही काही निराशाजनक खेळी होऊ शकतात. तो जगातील एक सर्वोत्तम फलंदाज आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तर त्याला तोड नाही. इतक्या वर्षांपासून ज्यानं उत्तम कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. मग अशा व्यक्तीसोबत कठीण काळही येऊ शकतो. काही सामन्यांमध्ये कमी धावा होऊ शकतात", असं जोस बटलर म्हणाला.
"प्रतिस्पर्धी संघाची कामगिरी चांगली होऊ नये असं एक खेळाडू म्हणून तुम्हाला नक्कीच वाटू शकतं. पण जसं मी म्हणालो तसं विराटचा रेकॉर्ड सत्य दाखवतो. त्यानं भारतासाठी जेवढे सामने जिंकून दिले आहेत ती एक खरंच कमालीची गोष्ट आहे. अशात तुम्ही त्याच्या कामगिरीवरुन असे प्रश्न उपस्थित करू शकत नाही", असंही बटलर पुढे म्हणाला.
विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळाचा सामना करत आहे. त्यामुळे संघातील त्याच्या निवडीबाबतही वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मानं अतिशय स्पष्ट शब्दात व्यवस्थापन याबाबत अजिबात विचार करत नाहीय. आम्हाला खेळाडूच्या गुणवत्तेवर पूर्णपणे विश्वास आहे, असं स्पष्ट केलं आहे. रोहित शर्मा आणि जोस बटलरशिवाय पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधार बाबर आझम यानंही कोहलीला पाठिंबा दिला आहे.