अयाज मेनन
नवी दिल्ली : जोस बटलरचे वादळी शतक आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात बाजी मारताना सनरायझर्स हैदराबादचा ५५ धावांनी धुव्वा उडवला. गेल्या तीन सामन्यांत दुसरा विजय मिळवल्याने राजस्थानचा आत्मविश्वास उंचावला असून सहा गुण मिळवले आहेत.
राजस्थानच्या विजयाच्या शिल्पकार ठरला तो जोश बटलर. त्याने ६४ चेंडूंत दिलेल्या १२४ धावांच्या जोरावर राजस्थानने ३ बाद २२० धावांचा एव्हरेस्ट उभारला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाचा डाव ८ बाद १६५ धावांवर मर्यादित राहिला. हैदराबाद संघ सध्या प्रचंड अडचणीत आला आहे. मुस्तफिझूर रहमान आणि ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी ३ बळी घेत हैदराबादचा पराभव निश्चित केला.
n जोस बटलर व संजू सॅमसन यांची १५० धावांची भागीदारी राजस्थानची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी ठरली. २०२० साली बेन स्टोक्स-सॅमसन यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १५२ धावांची भागीदारी केली होती.n राजस्थानने आपली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या उभारली.n बटलरने राजस्थानकडून सर्वोत्तम वैयक्तिय खेळी करताना सॅमसनचा (११९) विक्रम मोडला.n राजस्थानकडून शतक झळकावणारा बटलर तिसरा विदेशी फलंदाज ठरला. शेन वॉटसनने दोन, तर बेन स्टोक्सने एक शतक झळकावली आहेत.
नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून नेतृत्त्व काढून घेतल्यानंतर हैदराबाद संघ वादात अडकला. धावांचा पाठलाग करताना त्यांना वॉर्नरची कमतरता भासली. अर्धशतकी सलामीनंतर हैदराबादचा डाव गडगडला. गोलंदाजीतही हैदराबादकडून निराशा झाली. एकट्या राशिद खानचा अपवाद वगळता इतर कोणालाही सातत्य राखता आलेले नाही. हैदराबादला नव्याने संघ बांधणी करावी लागेल. त्याआधी, बटलरने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. त्याने ११ चौकारांसह तब्बल ८ षटकार टोलावले. बटलरची शरीरयष्टी साधारणच आहे, मात्र तो आपल्या कमालीच्या टायमिंगच्या जोरावर ८०-९० मीटरपर्यंतचे षटकात लिलया मारतो. हैदराबादने बटलरसह संजू सॅमसनचे सोडलेले दोन झेल निर्णायक ठरले. यामुळे त्यांनी दीडशेची भागीदारी केली आणि सामना राजस्थानकडे झुकला. सॅमसननेही बटलरला चांगली साथ दिली. सॅमसन बाद झाल्यानंतर टलरने रियान परागसह वेगवान ४२ धावांची भागीदारी करत राजस्थानला दोनशेपलीकडे नेले.