Big Bash League 2024 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये वादळी खेळी पाहायला मिळाली. अन कॅप्ड जोश ब्राऊनने ( Josh Brown) ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळताना ए़डिलेड स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हिटने ७ बाद २१४ धावांचा पाऊस पाडला आणि त्यातल्या १४० धावा या एकट्या ब्राऊनच्या होत्या. त्याने ५७ चेंडूंत १० चौकार व १२ षटकारांची आतषबाजी करून ही विक्रमी खेळी केली. त्याला कर्णधार नॅथन मॅकस्वीनी ( ३३) याची साथ मिळाली, परंतु अन्य फलंदाज एकेरी आकड्यावर माघारी परतले. एडिलेडचा संपूर्ण संघ १६० धावांत तंबूत परतला.
- ब्राऊनने त्याच्या खेळीत १२ षटकार खेचले, जे बिग बॅश लीगच्या एका डावातील सर्वाधिक ठरले. यापूर्वी ख्रिस गेल, क्रेग सिमॉन्स व ख्रिस लिन ( दोन वेळा) यांनी एका इनिंग्जमध्ये ११ षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
- बिग बॅश लीगमधील ब्राऊनची १४० धावांची खेळी ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. या विक्रमामध्ये ग्लेन मॅक्सवेल ( १५४* वि. होबर्ट हरिकेन्स, २०२१-२२) आणि मार्कस स्टॉयनिस ( १४७* वि. सिडनी सिक्सर्स ) हे आघाडीवर आहेत.
- बिग बॅश लीगच्या प्ले ऑफ सामन्यातील ब्राऊनची १४० धावांची खेळी ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी २०१७-१८ मध्ये जॅक वेदराल्डने ( ११५ वि. हरिकेन्स) फायनलमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती.
- ब्राऊनने १४० धावांमध्ये ११२ धावा या चौकार-षटकारांनी मिळवल्या. यासह त्याने बिग बॅश लीगमधील ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. मॅक्सेवलने नाबाद १५४ धावांत २२ चौकार व ४ षटकारासह ११२ धावा चौकार-षटकारांनी मिळवल्या होत्या.
- ब्राऊनने ४१ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले आणि ही दुसरी संयुक्त जलद सेन्च्युरी ठरली. २०१३-१४ मध्ये सिमॉन्सने ३९ चेंडूंत स्ट्रायकर्सविरुद्ध शतक झळकावले होते, तर मॅक्सवेलने २०२१-२२ मध्ये हरिकेन्सविरुद्ध ४१ चेंडूंत शतक केले होते.
- ट्वेंटी-२०च्या प्ले ऑफ सामन्यात ब्राऊनच्या १४० धावांपेक्षा दोनच फलंदाजांना अधिक धावा करता आल्या आहेत. ख्रिस गेलने ( नाबाद १४६ ) आणि तमिम इक्बाल ( नाबाद १४१) यांनी बांगलादेश प्रीमिअर लीग फायनल ( अनुक्रमे २०१७-१८ व २०१८-१९) मध्ये वादळी खेळी केली होती.
- ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीगमधील अनकॅप्ड खेळाडूची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. २०१९ मध्ये ब्रँडन किंगने सीपीएलमध्ये नाबाद १३२ धावा केल्या, तर २०११ मध्ये पॉल व्हॅल्थाटीने नाबाद १२० धावा केलेल्या.
Web Title: Josh Brown scored 140 runs in just 57 balls with 12 sixes & 10 fours for Brisbane Heat in the BBL 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.