जगाच्या कोणत्या कोपऱ्यात युगांडा हा देश आहे... हे चटकन कुणीच सांगू शकत नाही. नावावरून तो आफ्रिकेतीलच एखादा देश असावा, याचा अंदाज लावता येतोय... केन्या, रवांडा, दक्षिण सुदान, कोंगो आणि तन्झानिया या देशांच्या सीमा युगांडाला टेकलेल्या आहेत... ४.५९ कोटी लोकसंख्या असलेला हा देश... क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात ७९व्या क्रमांकावर येतो... यापूर्वी कधीच या देशाची जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी आज होतेय आणि पुढे काही दिवस तरी नक्कीच होईल... त्याला कारणही तसेच आहे. वन डे वर्ल्ड कप संपला आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची धामधुम सुरू झाली. अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदासाठी २०२४च्या जून महिन्यात ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
युगांडाच्या एन्ट्रीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील २० संघ पूर्ण झाले; जाणून घ्या स्पर्धेचा फॉरमॅट अन् तारखा
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये एकूण २० संघ सहभागी होणार आहेत आणि त्यामध्ये विसावे स्थान पटकावणारा युगांडा हा देश ठरला आहे... १९५८ मध्ये युगांडाचे खेळाडू केन्या व तंझानिया यांच्या खेळाडूंसह ईस्ट आफ्रिका टीम बनून आयसीसी स्पर्धांमध्ये खेळले होते. १९७५च्या वर्ल्ड कपमध्ये ईस्ट आफ्रिकेचा संघ खेळला होता आणि त्यांना तीनही सामन्यांत हार पत्करावी लागली होती. १९८९मध्ये ईस्ट आफ्रिका टीम वेगळी झाली आणि ईस्ट-सेंट्रल आफ्रिका संघ अशी विभागणी झाली. यात मलावी, तंझानिया, युगांडा आणि झाम्बिया हे चार देश होते. १९९८मध्ये युगांडाला आयसीसीच्या असोसिएट सदस्याचा मान मिळाला. आज त्यांनी शेजारच्या रवांडा संघाला पराभूत करून २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पात्रता निश्चित केली.
पण, युगांडात १०८ वर्षांपूर्वी क्रिकेटची सुरूवात झाली होती आणि त्यामागे भारतीयांचा सहभाग होता... हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे... ब्रिटीशांचे राज्य तेव्हा युगांडावरही होते आणि त्यांनी भारतीय मजुरांना युगांडात आणले होते... तेव्हा युगांडाच्या लोकांना क्रिकेट हा खेळ समजला आणि त्यांनी शालेय स्थरावर या खेळाला प्राधान्य दिले. तेथील अनेक शाळांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. १९३९ मध्ये चार शालेय संघांमध्ये 'Schools Cricket Week' भरवण्यात आळा. त्याची व्याप्ती हळुहळू वाढत गेली. १९४० आणि १९५०च्या दशकात तिरंगी स्पर्धा सुरु झाल्या. १९६६मध्ये पहिल्या ईस्ट आफ्रिकन अजिंक्यपद स्पर्धेत युगांडाने बाजी मारली. १९९८पर्यंत आयसीसीचे सदस्य होईपर्यंत युगांडासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी होती.
युगांडाने आज रवांडावर विजय मिळवून २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पात्रता निश्चित केली. युगांडाच्या संघात पटेल, शाह, नाक्रानी या भारतीय वंशाच्या खेळाडूंची नाव दिसत आहेत. यामागे एक इतिहास आहे आणि तिथूनच खरी युगांडाच्या क्रिकेटला सुरुवात झाली. १८९० च्या दशकात, युगांडा रेल्वे बांधण्यासाठी ब्रिटिश इंडियाने ३२ हजार भारतीय मजुरांना पूर्व आफ्रिकेत इंडेंटर्ड लेबर कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत भरती करण्यात आले. इथे वाचलेले बहुतेक भारतीय मायदेशी परतले, परंतु ६,७२४ लोकांनी रेल्वे बांधणी झाल्यानंतर ईस्ट आफ्रिकेत राहण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही व्यापारी बनले आणि कापूस जिनिंग आणि कापूस किरकोळ विक्रीचा ताबा घेतला. ब्रिटीशांकडून मिळालेलं क्रिकेट तिथे त्यांनी वाढवले..