नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात 'कॅप्टन कूल' हे बिरूद अभिमानानं मिरवणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. कारण, 2013 मध्ये याच दिवशी, म्हणजे 23 जूनला त्याच्या नावावर एका मोठ्या पराक्रमाची नोंद झाली होती.
टी-20 विश्वचषक, वनडे वर्ल्ड कप आणि मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही महत्त्वाच्या ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्यापैकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने 23 जून 2013 रोजी नाव कोरलं होतं. यजमान इंग्लंडवर थरारक विजयाची नोंद करून टीम इंडियानं ही ट्रॉफी जिंकली होती आणि 'क्रिकेटमधील तीनही मानाच्या ट्रॉफी उंचावणारा पहिला कर्णधार', असा तुरा महेंद्रसिंह धोनीच्या शिरपेचात खोवला गेला होता.
पावसाच्या व्यत्ययामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 20 षटकांचा करण्यात आला होता. खरं तर, धोनीसेना टी-20 मध्ये माहीर; पण या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा डाव गडगडला होता. 20 षटकांत त्यांना 7 बाद 129 पर्यंतच मजल मारता आली होती. स्वाभाविकच, सामन्याचं पारडं इंग्लंडच्या बाजूने झुकलं होतं. पण, धोनीच्या 'कूssल' रणनीतीच्या जोरावर भारतानं इंग्लंडला पाच धावांनी हरवलं आणि विजयोत्सव साजरा केला.