बडोदा संघाचा क्रिकेटपटू विष्णू सोलंकी ( Baroda Cricketer Vishnu Solanki) याच्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या विष्णूच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती एकामागून एक देवाघरी गेल्या. काही दिवसांपूर्वी विष्णूच्या नवजात मुलीचे निधन झाले होते आणि त्या धक्क्यातून तो सावरणार तितक्यात आज त्याच्या वडिलांचेही निधन झाल्याचे वृत्त समोर आले. २७ फेब्रुवारीला विष्णू सोलंकीच्या वडिलांचे निधन झाले.
रविवारी सकाळी विष्णूला वडिलांच्या निधनाचे समजले, परंतु त्याने आपल्या संघाप्रती निष्ठा कायम राखताना सामना पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. घरापासून हजारो किलोमीटर दूर विष्णू सामना खेळत होता. त्याने कुटुंबीयांना मॅच पूर्ण करून घरी येणार असल्याचे कळवले. बडोदा व चंडिगढ यांच्यातला सामना ड्रॉ राहिला. मुलीच्या निधनानंतरही विष्णूनं घट्ट मन करून सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आणि त्याने चंडिगढविरुद्ध शतकी खेळीही केली.