भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. २०९ धावांनी झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मावर टीका झाली. आता भारतीय संघाच्या कर्णधार बदलाची मागणी होतेय. पण, रोहितला तातडीने हटवले जाणार नाही, हेही तितकेच खरे आहे. आता भारतीय संघ आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे आणि रोहित शर्माला त्याच्या टीकाकारांना गप्प करण्याची संधी आहे. भारतीय संघाला २०१३ मध्ये एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
२०१३ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला यश मिळालेले नाही. रोहित, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आदी सीनियर खेळाडूंना आलेले अपयश हे टीम इंडियाच्या WTC Final मधील पराभवाचे मुळ कारण ठरले. त्यामुळे पुढील WTC पर्व आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआयने आताच हालचाल करावी, अशी मागणी होतेय. त्यात १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आणि माजी निवड समिती प्रमुख दिलिप वेंगसरकर यांनी जोरदार टीका केली आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिसेल्या मुलाखतीत वेंगसरकरांनी बीसीसीआयची पोलखोल केली आहे. निवड समितीत अनेक वर्ष असलेल्यांमध्ये दृष्टीकोनाचा अभाव असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच रोहितनंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल, यासाठी त्यांना पर्याय तयार करता आला नाही, असेही ते म्हणाले. “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी गेल्या सहा-सात वर्षांत ज्या निवडकर्त्यांना पाहिले आहे, त्यांच्याकडे ना खेळाची दृष्टी, सखोल ज्ञान किंवा क्रिकेटची जाण नाही. त्यांनी शिखर धवनला भारताचा कर्णधार बनवले; इथेच तुम्ही भावी कर्णधार तयार करू शकला असता,” असे वेंगसरकर म्हणाले.
संघ व्यवस्थापनाची निंदा करत ते पुढे म्हणाले, “तुम्ही कोणालाच तयार केलेले नाही. जसं येतं तसं खेळा. तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाबद्दल बोलता, त्यांची बेंच स्ट्रेंथ कुठे आहे? केवळ आयपीएल असणे, मीडिया हक्कात करोडो रुपये मिळवणे, ही एकमेव उपलब्धी असू शकत नाही.”