भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) आज अखेर हटला. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईत पार पडली आणि त्यात रॉजर बिन्नी ( Roger Binny) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. २०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुलीसमोर कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं. त्यातही त्याने BCCI च्या टीमला सोबत घेऊन इंडियन प्रीमिअर लीगचे आयोजन युएई व भारतात करून दाखवला. पण आता १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष असणार आहेत.
''मी रॉजर बिन्नी यांना लहानपणापासून बघतोय. त्यांनी मला लहानाचा मोठा होताना पाहिले. त्यांच्या अनुभवाचा बीसीसीआयला फायदा होईल. महिला आयपीएलचा निर्णय खूप चांगला आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे खूप आवश्यक आहे आणि बीसीसीआय त्यादृष्टीने योग्य काम करत आहे,'' असे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला.
मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची BCCIच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शेलार यांना BCCIच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आशिष शेलार हे जून २०१५मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. १२ जानेवारी २०१७मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
बीसीसीआयची नवी टीम
- अध्यक्ष - रॉजर बिन्नी ( कर्नाटक)
- सचिव - जय शाह ( गुजरात)
- उपाध्यक्ष - राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश)
- खजिनदार - आशिष शेलार ( महाराष्ट्र)
- सर चिटणीस - देवाजित सैकिया ( आसाम)
- आयपीएल चेअरमन - अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)
-
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: JUST IN: BCCI AGM meeting over, Roger Binny elected new BCCI chief, BJP leader Ashish Shelar new Treaseurer, check BCCI New Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.