भारताच्या कसोटी संघाबाहेर बसलेला चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुनरागमनासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतोय. मागील दोन वर्षांत कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी करू न शकलेल्या चेतेश्वर पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाकावर बसवण्यात आले. त्यानंतर तो संघात पुनरागमन करण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळला, परंतु एकदा ९०+ धावा केल्यानंतर त्याला फार काही करत आले नाही. आता चेतेश्वर पुजारा कौंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळणार आहे. कौंटी चॅम्पियनशीपच्या ससेक्स ( Sussex) क्लबने त्याला करारद्ध केले आहे आणि तो तेथील वन डे कप स्पर्धेतही खेळताना दिसेल. ट्रॅव्हीस हेडने माघार घेतल्यामुळे चेतेश्वरला संधी मिळाली आहे.
हेड व त्याची पत्नी यांना पहिलं बाळ होणार असल्यामुळे खेळाडूने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजारा आता संपूर्ण चॅम्पियनशीपमध्ये खेळणार आहे. यापूर्वी त्याने डर्बीशायर, नॉटिंगहॅमशायर व यॉर्कशायर क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. चेतेश्वर पुजारा म्हणाला,''ससेक्स कौंटी क्रिकेट क्लबकडून खेळण्यासाठी मी उत्साहीत आहे. मी अनेक वर्ष लंडनमध्ये कौंटी क्रिकेट खेळतोय.''
चेतेश्वर पुजाराने ९५ कसोटीत ४३.८७ च्या सरासरीने ६७१३ धावा केल्या आहेत. त्यात १८ शतकं व ३२ अर्धशतकं आहेत आणि नाबाद २०६ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. २२६ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुजाराने ५०.५९च्या सरासरीने १६९४८ धावा केल्या आहेत. त्यात ५० शतकं व ७० अर्धशतकं आहेत.
Web Title: JUST IN: Cheteshwar Pujara has been signed by Sussex for the 2022 County Championship and One-Day Cup as a replacement for Travis Head
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.