वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आता कुठे माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला चांगला सूर गवसला होता. दोन सामने गमावल्यानंतर त्यांनी विजयाचा चौकार मारला आणि गुणतालिकेत ८ गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली. आता ऑस्ट्रेलियाला उर्वरित ३ सामन्यांत त्यांना विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यांचा नेट रन रेट सध्या ०.९७० असा चांगला आहे आणि तोही निर्णायक ठरणार आहे. अशात त्यांना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाला शनिवारी इंग्लंडचा सामना करायचा आहे आणि त्यापूर्वी त्यांच्या स्टार खेळाडूचा अपघात झाला आहे.
सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी
ग्लेन मॅक्सवेलला ( Glenn Maxwell) इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे होणाऱ्या लढतीत खेळता येणार नाही. सराव संपून गोल्फ कार्टवरू परतत असताना त्याचा तोल गेला आणि त्याला दुखापत झाली. कन्कशन नियमानुसार त्याला आता ६ ते ८ दिवस विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजासाठी मार्कस स्टॉयनिस किंवा कॅमेरून ग्रीन याच्यापैकी एकाला रिप्लेस करावे लागेल. अशा परिस्थितीत मार्नस लाबुशेन याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित असेल.
या स्पर्धेत मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्ध ४० चेंडूंत सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. अॅडम झम्पासह संघाचा दुसरा महत्त्वाचा फिरकीपटू म्हणूनही तो भूमिका बजावतोय. इंग्लंडनंतर त्यांना अफगाणिस्तान व बांगलादेश यांचा सामना करायचा आहे.
मॅक्सवेलचे रेकॉर्ड्स
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर आला आहे. ख्रिस गेलने सर्वाधिक ४९ षटकार खेचले आहेत. त्यापाठोपाठ रोहित शर्मा ( ४०), एबी डिव्हिलियर्स ( ३७), ग्लेन मॅक्सवेल ( ३१*) आणि रिकी पाँटिंग ( ३१) असा क्रम येतो.
वन डे क्रिकेटमध्ये ४१-५० या शेवटच्या १० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ग्लेन मॅक्सवेल १०६ ( ४४ चेंडू) पाचव्या क्रमांकावर आला आहे. एबी डिव्हिलियर्स ( १२१ धावा, ३६ चेंडू वि. वेस्ट इंडिज २०१५), रोहित शर्मा ( ११० धावा, ४४ चेंडू वि. श्रीलंका २०१४), एबी ( १०९* धावा ३५ चेंडू वि. वेस्ट इंडिज २०१५) आणि रोहित ( १०७* धावा ३७ चेंडू वि. श्रीलंका २०१७) हे आघाडीवर आहेत.