Join us  

ध्रुवकडे पाहताच वाटायचे, या मुलात ‘विशेष’आहे; कोच फुलचंद यांनी सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

वडील कारगिल युद्धात देशासाठी लढले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 5:37 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘१४ व्या वर्षी ध्रुव जुरेल माझ्या अकादमीत एकटा आला त्यावेळीच माझ्या लक्षात आले की, या मुलामध्ये काहीतरी विशेष आहे.’ ध्रुवचे प्रशिक्षक फुलचंद यांनी शुक्रवारी आपल्या शिष्याबाबत हे अभिमानास्पद वक्तव्य केले. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत ध्रुवला कॅप मिळताच फुलचंद भावुक झाले होते. ध्रुवचे वडील नेमचंद हे कारगिल युद्धात देशासाठी लढले. वडिलांच्या निधनानंतर १४ वर्षांचा ध्रुव आग्र्याहून एकटाच नोएडातील फुलचंद यांच्या प्रसिद्ध अकादमीत आला होता.

ध्रुवसोबत कोणीच आले नाही, हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. फुलचंद म्हणाले, ‘मी काही विचारण्याआधीच तो मला म्हणाला, ‘सर, माझे नाव ध्रुव जुरेल आहे. कृपया मला आपल्या अकादमीत प्रवेश द्या.’ मी त्याच्या आत्मविश्वासामुळे फारच प्रभावित झालो होतो. त्याच्यासोबत कुणीही नव्हते. मला वाटले, तो जवळपास राहणारा असावा. त्यावर तो पुढे म्हणाला, ‘सर, मी आग्रा येथून आलो आहे.  ज्या मित्राने माझ्या थांबण्याची व्यवस्था केली होती, तो आता फोनदेखील उचलत नाही. यामुळे मला संशय आला की, क्रिकेटसाठी हा मुलगा घरून पळून तर आला नसावा!’

२३ वर्षांच्या ध्रुवने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध १०४ चेंडूंत ४६ धावा ठोकल्या. त्याचा इथपर्यंतचा प्रवास खडतर राहिला. उत्तर प्रदेश संघाकडून वयोगटातील स्पर्धेत खेळून तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचा उपकर्णधार बनला. २०२०च्या विश्वचषकात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०२२ च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला संघात घेतले.  मागच्या वर्षी त्याला अंतिम एकादशमध्ये संधी देण्यात आली.  गुरुवारी दिनेश कार्तिकने त्याला कसोटी कॅप प्रदान केली. हा प्रसंग डोळ्यांत साठवताना कोच फुलचंद पुढे म्हणाले, ‘आपल्या एका शिष्याने इतकी मोठी कामगिरी केली, एका शिक्षकासाठी याहून मोठा सन्मान कोणता असू शकतो! ध्रुव हा कसोटीपटू बनलेला माझा पहिला खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज शिवम मावी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा दुसरा खेळाडू आहे.’

ध्रुवच्या वडिलांनी १९९९ च्या कारगिल युद्धात भाग घेतल्यानंतर त्यांनी २००८ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मी ध्रुवला वडिलांचा मोबाइल नंबर विचारला. वडिलांकडून विचारपूस केल्यानंतर कळले की, ते सोबत येणार होते; पण आजच घरी ध्रुवच्या आजोबांची तेरवी आहे. १४ वर्षांचा हा मुलगा आग्रा ते नोएडा असा प्रवास करू शकतो तर त्याच्यात काहीतरी विशेष असावे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघराजकोट