मुंबई : कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती आज टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुंबईतील मुख्यालयात मुख्य प्रशिक्षकासाठी मुलाखती सुरू झाल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवानंतर रवी शास्त्रींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे या पदावर ते कायम राहतात की नवा चेहरा निवडला जातो, हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. या पदासाठी सहा उमेदवारांमध्ये चुरस रंगणार होती, परंतु मुलाखतीपूर्वी एका उमेदवारानं माघार घेतली.
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्याकडून शास्त्री यांना कडवी लढत मिळू शकते. 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत यांच्या अर्जावरही गांभीर्याने विचार होऊ शकतो. तसेच, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले आहेत. पण, रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे. शुक्रवारी या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या असून सायंकाळी 7 वाजता याबाबतची घोषणा करण्यात येईल.
मुलाखतीपूर्वीच सिमन्स यांनी माघार घेतली आहे. सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी वैयक्तिक कारण देताना माघार घेतली आहे.