ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज जस्टीन लँगर ( Justin Langer) याचे नाव टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकासाठी काही दिवसांपूर्वी जाहीरात दिली होती आणि २७ मेपर्यंत या पदाकरिता अर्ज करता येणार आहे. या शर्यतीत चर्चेत असलेल्या लँगरने माघार घेतली आणि हे काम थकवणारे असल्याचे त्याने म्हटले. लँगरने आयपीएल २०२४ दरम्यान लखनौ सुपर जायंट्ससोबत काम करत असताना टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासंदर्भात लोकेश राहुलसोबत चर्चा केली होती. लँगरने दावा केला की राहुलने त्याला सांगितले, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला सामना करावा लागणारे 'राजकारण आणि दबाव' हे कोणत्याही आयपीएल प्रशिक्षकापेक्षा 'हजारपट' आहे.
"मला माहित आहे की ही एक सर्वसमावेशक भूमिका आहे आणि ऑस्ट्रेलियन संघासोबत चार वर्ष मी हे काम केले आहे, ते थकवणारे आहे," असे लँगरने बीबीसी स्टम्प्डवर सांगितले. "मी लोकेश राहुलशी बोलत होतो आणि तो म्हणाला, 'तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला वाटत असेल की आयपीएल संघात दबाव आणि राजकारण आहे, तर ते भारताचे प्रशिक्षकपदावर विराजमान झाल्यावर हजाराने गुणाकार करा. हा एक चांगला सल्ला होता, मला वाटते," असेही तो म्हणाला.
BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा
दरम्यान, BCCI चे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूशी बोर्डाने संपर्क साधला नसल्याचा दावा केला आहे. राहुल द्रविडचा उत्तराधिकारी भारतीय असू शकतो, असे सांगून त्यांनी संकेत दिले की त्यांना देशातील खेळाच्या संरचनेची "सखोल माहिती" असली पाहिजे. सध्या कोलकाता नाईट रायडर्सला मार्गदर्शन करत असलेल्या गौतम गंभीरसह चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचेही नाव चर्चेत आहे.