फिटनेसच्या समस्यांनी ग्रासलेल्या तसेच अनुभवहीन असलेल्या भारतीय संघाकडून मालिकेत पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर स्तब्ध झाले. पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणारे लँगर यांनी भारताला कधी कमी लेखण्याची चूक करायची नाही, हा मालिकेतून धडा शिकल्याचे म्हटले आहे.चॅनल सेव्हनशी बोलताना प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले, ‘भारताची लोकसंख्या दीड अब्ज आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशातील अंतिम ११ खेळाडू खरोखर सर्वाेत्तम आणि बलाढ्य असेच असतील. मालिका रोमहर्षक होती. कुणी एक संघ जिंकणार. आज मात्र कसोटी क्रिकेट जिंकले.
गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नाही…ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले…अशा प्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चीत केले. अनुभवी आणि दिग्गज खेळाडू जखमी असताना नवख्या चहेऱ्यांनी जिद्दी खेळ करीत ऑस्ट्रेलियाचे ‘गर्वाचे घर खाली’ केले.
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली.