जोहान्सबर्ग, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावेल, अशी सर्वांनच खात्री आहे. मागील वर्षभरात भारतीय संघाने परदेशात विजयी तिरंगा फडकवला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सलामीच्याच सामन्यात भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे दोन महत्त्वाचे गोलंदाज या सामन्यासाठी तंदुरुस्त असल्याची माहिती प्रशिक्षक ऑटीस गिब्सन यांनी दिली. आता या स्पीड स्टारचा सामना विराटसेना कशी करते याची उत्सुकता लागली आहे.
डेल स्टेन आणि कागिसो रबाडा हे दोघेही इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) दरम्यान दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांना आयपीएलमधून माघार घ्यावी लागली होती. त्यात त्यांच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यानं वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होणार आहे. उद्धाटनीय सामन्यातही स्टेन व रबाडा यांच्या खेळण्यावर संदिग्धता होती. मात्र, गिब्सन यांनी हे दोघेही पहिल्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होतील अशी माहिती दिली आहे.
ते म्हणाले,'' कागिसो रबाडा आणि डेल स्टेन हे पूर्णपणे तंदुरुस्त झालेले नाहीत, परंतु पहिल्या लढतीपूर्वी ते फिटनेस सिद्ध करतील. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. रबाडा व स्टेन लवकरच संघात परततील आणि आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील. ते दुखापतीतून सावरत आहेत आणि अंतिम अकरामध्ये स्थान पटकावतील.''
आयपीएलमध्ये स्टेन आणि रबाडा यांनी दमदार कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना रबाडाने 12 सामन्यांत सर्वाधिक 25 विकेट्स घेतल्या, परंतु त्याला दुखापतीमुळे लीगमधून माघार घ्यावी लागली. डेल स्टन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चमूत उशीरा दाखल झाला, परंतु त्याने थोड्याच सामन्यात आपला प्रभाव पाडला. त्यालाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्याने दोन सामन्यात 4 विकेट्स घेतल्या.