IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada)याला भारतीय संघाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर बसवण्यात आलं आहे. रबाडाला कोणतीही दुखापत झालेली नाही. तसंच त्याची कामगिरी देखील उत्तम राहिली आहे. तरीही रबाडाला एकदिवसीय संघातून बाहेर करण्याबाबत द.आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीनं कगिसो रबाडाला आराम दिला आहे. वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. कगिसो रबाडा कसोटी मालिकेत चांगल्या फॉर्मात होता. तीन सामन्यात त्यानं २० हून अधिक विकेट्स घेतल्या. संघाचा आघाडीचा गोलंदाज संघात नसणं याचा मोठा फटका द.आफ्रिकेच्या संघाला बसणार आहे. दुसरीकडे दुखापतीमुळे द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्खिया देखील एकदिवसीय मालिकेत खेळत नाहीय. त्यामुळे संघाच्या गोलंदाजीला दुहेरी फटका बसला आहे.
विशेष म्हणजे, कगिसो रबाडाला आराम देत असताना त्याच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूचा संघाच्या ताफ्यात द.आफ्रिका क्रिकेट बोर्डानं समावेश केलेला नाही. रबाडाच्या जागी संघात सिसांदा मगाला, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस आणि वेन पार्नेल हे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय मार्को यानसन देखील संघात आहे. ज्यानं कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करत एकूण १९ विकेट्स मिळवल्या आहेत.