नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहेत. दोन्ही संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक मानले जातात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हायव्होल्टेज सामना ठरत असतो. जेव्हा या दोन्ही संघामध्ये सामने होतात तेव्हा नवीन विक्रम तयार होतात. मागील वर्षी झालेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ट्वेंटी-20 विश्वचषक 2022 च्या सलामीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने होते. हा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानावर पोहोचले आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक प्रेक्षकांची नोंद झाली.
मात्र, अनेकवेळा दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये खूप गरमागरमीही पाहायला मिळते. मग ते वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तरचे प्रकरण असो किंवा गौतम गंभीर आणि कामरान अकमलचे असो. नुकतेच एका मुलाखतीत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने या वादावर भाष्य केले आहे. पाकिस्तानचा यूट्यूबर नादिर अलीने यूट्यूबवर एक पॉडकास्ट शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलशी संवाद साधला आहे. गौतम गंभीरसोबतच्या वादाबद्दल बोलताना कामरान अकमलने म्हटले की, हे सर्व गैरसमजातून घडले आहे. 2009 मध्ये आशिया चषक स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होता. सईद अजमलने गोलंदाजी केली आणि मी स्टम्पमागून अपील केली. यावर नादिरने शिवीगाळ का केली असे विचारले असता कामरानने सांगितले, "मी शिवीगाळ केली नाही, तो (गंभीर) मस्करी करत होता. त्याने बहुधा स्वत:ला शिवीगाळ केली असावी."
"धोनीसारखा कर्णधार होता म्हणून सगळे मिटले"दरम्यान, कोणी स्वत:लाच का शिवीगाळ करेल असा प्रश्न विचारला असता कामरान अकमलने सावध उत्तर दिले. याबाबत सविस्तर माहिती देताना अकमलने म्हटले, "जेव्हा एखादा खेळाडू बाद होतो किंवा धावा होत नाहीत, तेव्हा तो स्वत:शीच काहीही बोलत राहतो." इशांत शर्माबद्दल बोलताना अकमल म्हणाला की, इशांतने शिवीगाळ केली होती आणि मला वाटते की त्याचे फळ त्यालाच मिळाले (मिश्किलपणे). त्याने जे काही केले पण धोनीसारखा कर्णधार होता म्हणून सगळे काही ठीक झाले. त्यामुळेच हे प्रकरण मिटले. कामरान अकमलने 2002 मध्ये पदार्पण करून उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याने 11 एप्रिल 2017 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"