नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघाला आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली होती मात्र बाबरला या स्पर्धेत काही खास कामगिरी करता आली नाही. 6 डावांमध्ये बाबर आझमने केवळ 68 धावा केल्या, ज्यामुळे पाकिस्तानी चाहते आणि माजी खेळाडू त्याच्यावर निशाणा साधत आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम, राशिद लतीफ आणि मोईन खान यांसारख्या खेळाडूंना बाबरच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. अशातच कामरान अकमलने (Kamran Akmal) देखील यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
हाफिज मोहम्मद इम्रानसोबत यूट्यूबवरून संवाद साधताना अकमलने खडेबोल सुनावले आहे. कर्णधारपदाबाबत बाबरशी वार्ता झाली का असा प्रश्न त्याला विचारला असता त्याने उत्तर दिले, "जेव्हा मला समजले की बाबरला कर्णधार बनवले आहे. तेव्हा मी त्याला म्हणालो की तू आता कर्णधार व्हावे असे मला वाटत नाही. पुढील 3-4 वर्षात तुला चांगली कामगिरी करायला हवी कारण सध्या संपूर्ण फलंदाजीची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे."
सक्षम कर्णधार व्हायला हवे - अकमलकामरानने अधिक म्हटले होते की, जर तू याकाळात 35-40 शतके झळकावलीस तर तुला आणखी आनंद मिळेल आणि कर्णधारपदाचाही आनंद मिळेल. सरफराज अहमदने कर्णधारपद सोडताच तुला कर्णधार बनवले जाईल. पण आता योग्य वेळ नाही", असा खुलासा त्याने केला आहे. मात्र बाबरला आता या भूमिकेतून बाजूला काढले तर ती खूप मोठी चूक ठरेल. त्यामुळे बाबरने आता खराब खेळीकडे दुर्लक्ष करून सक्षम कर्णधार व्हायला हवे असेही कामरानने म्हटले.
श्रीलंकेने सहाव्यांदा जिंकला आशिया कप अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकात बाबर आझमने निराशाजनक खेळी केली होती. मात्र पाकिस्तानी संघाने सांघिक खेळीच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली. बाबरने स्पर्धेतील सहा डावांमध्ये केवळ 68 धावा करून चाहत्यांना निराश केले. अंतिम सामन्यात 23 धावांनी मिळालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे तब्बल 10 वर्षांनंतर आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. श्रीलंकेच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सांघिक खेळी करून सहाव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावला.