Arshdeep Singh: "भारतीय संघाला दुसरा झहीर खान मिळाला आहे, त्याच्याकडे वेग आणि स्विंग दोन्ही आहे"

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:52 PM2022-10-01T12:52:34+5:302022-10-01T12:53:19+5:30

whatsapp join usJoin us
Kamran Akmal has said that the Indian team has got a second Zaheer Khan in the form of Arshdeep Singh | Arshdeep Singh: "भारतीय संघाला दुसरा झहीर खान मिळाला आहे, त्याच्याकडे वेग आणि स्विंग दोन्ही आहे"

Arshdeep Singh: "भारतीय संघाला दुसरा झहीर खान मिळाला आहे, त्याच्याकडे वेग आणि स्विंग दोन्ही आहे"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करून आपली प्रतिभा दाखवून दिली. २३ वर्षीय अर्शदीपने आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातील त्याच्या पहिल्याच षटकात ३ बळी पटकावले. क्विंटन डी कॉक, रिली रॉसॉव आणि डेव्हिड मिलरला तंबूत पाठवून त्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची कंबर मोडली.

दरम्यान, पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळणार का याबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र अर्शदीप सिंगने केलेल्या शानदार कामगिरीमुळे तो विश्वचषकात देखील छाप सोडेल अशी अपेक्षा आहे. अर्शदीपला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. पाकिस्तानी संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने अर्शदीप सिंगच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच अर्शदीप सिंग म्हणजे भारतीय संघाला मिळालेला दुसरा झहीर खान असल्याचे त्याने म्हटले. अर्शदीप सिंगने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

अर्शदीप सिंग म्हणजे दुसरा झहीर खान - अकमल 
कामरान अकमलने त्याच्या फेसबुक चॅनेलवर बोलताना म्हटले, "अर्शदीप सिंग एक अप्रतिम गोलंदाज आहे. माझ्या मते त्याच्या रूपात भारतीय संघाला दुसरा झहीर खान मिळाला आहे. त्याच्याकडे वेग आणि स्विंग दोन्ही आहे, शानदार गोलंदाजी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याने पहिल्याच सामन्यात आफ्रिकेच्या आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद केले. एक युवा खेळाडू अशी कामगिरी करत असेल तर कौतुकास्पद आहे. भारतीय संघासाठी हे चांगले लक्षण आहे कारण त्यांना झहीर खाननंतर डावखुऱ्या गोलंदाजाची गरज होती." 

विश्वचषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना  

 

Web Title: Kamran Akmal has said that the Indian team has got a second Zaheer Khan in the form of Arshdeep Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.