पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल सध्या चर्चेत आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचे विश्लेषण करताना त्याने एक वादग्रस्त विधान केले. भारताविरूद्ध पराभव होताच अकमलने भारतीय संघाचे कौतुक करताना आपल्या संघावर बोचरी टीका केली. भारताने सहा धावांनी पाकिस्तानविरूद्ध विजय मिळवला. माफक १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेजाऱ्यांना घाम फुटला. पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमला लक्ष्य करत आहेत.
सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेत आहे. पाकिस्तानने स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. शेजाऱ्यांनी पहिला सामना अमेरिकेविरुद्ध आणि दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध पराभव पत्करला. आता पाकिस्तानला सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
अकमलची बोचरी टीकापाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर कामरान अकमलने म्हटले की, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरूष संघांविरूद्ध खेळणे बंद करायला हवे. याऐवजी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांविरूद्ध क्रिकेट खेळावे. पाकिस्तानच्या संघाने ही एवढी खालची पातळी गाठली आहे. काही खेळाडू तर विश्वचषक खेळण्यासाठी पात्र देखील नाहीत.
ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानचा संघ संघर्ष करत आहे. त्यांना इंग्लंडच्या धरतीवर यजमान संघाकडून २-० असा पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले, तर दोन सामन्यात इंग्लिश संघाने विजय मिळवला. या आधी आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
पाकिस्तानचे सलग दोन पराभवट्वेंटी-२० विश्वचषकात टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचा पराभव करताच भारताने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. तर पाकिस्तानला या पराभवासह सलग दुसऱ्यांदा हार पत्करावी लागली. त्यांना सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिकेने पराभवाची धूळ चारली होती. भारतीय संघाने आयर्लंडला नमवून विजयी सलामी दिली. त्यामुळे पाकिस्तानला सुपर ८ मध्ये पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. किंबहुना शेजाऱ्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.