न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज केन विलियम्सन ( Kane Williamson ) तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची जोडीदार सारा रहीमने मुलीला जन्म दिला आहे. विलियम्सनने इन्स्टाग्रामवर पत्नी आणि नवजात मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. केनने फोटोसोबत लिहिले की,'जगात सुंदर मुलीचे स्वागत आहे.''
केन व सारा यांची मोठी मुलगी मॅगी तीन वर्षांची आहे आणि लहान मुलगा एक वर्षाचा आहे. विलियम्सन पितृत्व रजेवर असल्यामुळे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत तो खेळला नाही. त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्यादोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्याच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे न्यूझीलंडने ७२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी मालिका जिंकली.
केन विलियम्सनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चार डावांत तीन शतके झळकावली. त्याने माउंट मौनगानुई येथे ११८ व १०९ धावांची खेळी खेळली आणि हॅमिल्टनमधील दुसऱ्या कसोटीत त्याने ४३ आणि नाबाद १३३ धावा केल्या. अशाप्रकारे ३२ कसोटी शतकांसह त्याने विराट कोहलीला मागे टाकले. सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो १२व्या स्थानावर पोहोचला.
केन व साराची लव्ह स्टोरी.. ब्रिस्टलमध्ये जन्मलेली सारा पेशाने नर्स आहे. केन आणि सारा यांनी लग्नाआधी ५ वर्ष रिलेशनशीनंतर १६ डिसेंबर २०२० साली पहिल्या मुलीला जन्म दिला. विलियम्सन आणि सारा यांची पहिली भेट न्यूझीलंडच्या एका रुग्णालयात झाली, जिकडे तो उपचारासाठी आला होता. केनवर उपचार सुरू असताना दोघांनी एकमेकांना त्यांचे फोन नंबर दिले. फोनवर काही काळ संभाषण झाल्यानंतर दोघं एकमेकांना डेटही करायला लागले.