चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी किवींच्या ताफ्यातील स्टार फलंदाज केन विलियम्सन याने दमदार शतक झळकावत संघाला दमदार विजय मिळवून दिला. चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत यजमान पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेलाही शह दिला. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या केन विलियम्सन याने दुसऱ्या सामन्यात नाबाद शतक झळकावले. या डावा त्याने अनेक खेळाडूंना एका दमात मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीचा विक्रम मोडला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४७ व्या शतकासह एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढणाऱ्या केन विलियम्सन याने विराट कोहली आणि रोहित शर्मालाही मागे टाकले आहे. केन विलियम्सनं शतकी खेळीसह वनडेत ७ हजार धावांचा टप्पा पार केला. या फॉर्मेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो कोहलीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झालाय. केन विलियम्सन याने १५९ डावात ७ हजार धावांचा पल्ला गाठला. कोहलीनं यासाठी दोन डाव अधिक खेळले होते.
सर्वात जलद ७००० धावा करणारा बॅटर
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावा करण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या हशीम अमलाच्या नावे आहे. त्याने अवघ्या १५० डावात हा पल्ला गाठला होता. आता फक्त तोच केन विलियम्सनच्या पुढे आहे. विराटसह केन यानं एका डावात रोहित शर्मा आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही मागे टाकले आहे. विलियम्सन आधी, मार्टिन गुप्टिल न्यूझीलंडकडून सर्वात जलद ७,००० धावा करणारा खेळाडू होता. त्याने १८६ डावांमध्ये वनडेतील हा पल्ला गाठला होता.
वनडेत सर्वात जलद ७ हजार धावा करणारे फलंदाज (डावानुसार)
- हाशिम आमला - १५० डाव
- केन विलियम्सन - १५९ डाव
- विराट कोहली - १६१ डाव
- एबी डिव्हिलियर्स - १६६ डाव
- सौरव गांगुली - १७४ डाव
- रोहित शर्मा - १८१ डाव
- ब्रायन लारा - १८३ डाव