ICC Test Ranking : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) यानं जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ICCनं गुरुवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या टीम इंडियाच्या कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यानंही क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरलेल्या स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) अव्वल स्थान गमवावे लागले, तर विराट कोहलीनं ( Virat Kohli) दुसरे स्थान कायम राखले आहे.
ICC नं जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत केननं ८९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत केननं १२९ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. त्याच्या या खेळीनं तो दोन स्थान वर सरकला अन् अव्वल क्रमांकावर विराजमान झाला. विराटच्या खात्यात ८७९ गुण आहेत, तर स्मिथच्या खात्यात ८७७ गुण आहेत. मेलबर्न कसोटीत ११२ धावा करणाऱ्या अजिंक्यनं पाच स्थानांची झेप घेताना सहावा क्रमांक पटकावला. त्याच्या खात्यात ७८४ गुण आहेत. चेतेश्वर पुजाराला दोन स्थानांचा घसरणीसह दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.