स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या जागी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार झालेला केन विल्यमसन सध्या फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नाही. आतापर्यंत झालेल्या यंदाच्या हंगामात त्याने ९ सामन्यात १९५ धावा केल्या. त्यात केवळ एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. असे असले तरी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा त्याच्यावरील विश्वास अजिबात कमी झालेला नाही. नुकताच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंड विरूद्धच्या कसोटीसाठी २० सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यात केन विल्यमसन याला संघात पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.
केन विल्यमसनने आपला शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता. त्यानंतर कोपराच्या दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपासून काही काळ दूर राहावे लागले होते. पण आता मात्र इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच त्याला कर्णधारपदावर ठेवण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यासोबतच काही नव्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू मायकल ब्रेसवेलला कसोटी संघात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडच्या टी२० आणि वन डे संघातही पदार्पण केले. त्याच्याशिवाय, विकेटकिपर कॅम फ्लेचर, वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर, सलामीवीर हॅमीश रूदरफोर्ड आणि वेगवान गोलंदाज जेकब डफी या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
इंग्लंड कसोटीसाठी न्यूझीलंडचा २० खेळाडूंचा संघ: केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, जेकब डफी, कॅमेरॉन फ्लेचर, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाझ, रचिन रवींद्र, हमिश रूदरफोर्ड, टिम साउदी, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, विल यंग