केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे ( World Test Championship) जेतेपद नावावर केले. १४४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले जागतिक जेतेपद न्यूझीलंडच्या नावावर राहिले. साऊदॅम्प्टन येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून टीम इंडियावर विजय मिळवला. या विजयानंतर केन विलियम्सननं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या खांद्यावर डोकं टेकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोनं अनेकांची मनं जिंकली. केननं विजयानंतर असं का केलं याबाबतचा खुलासा आता झाला असून किवी कर्णधाराच्या उत्तरानं भारतीयांच्या मनात त्याच्याप्रती आदर आणखी वाढला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम
केननं क्रिकबजशी बोलताना सांगितले की,''तो एक खास क्षण होता. भारताविरुद्ध खेळणे हे नेहमीच आव्हानात्मक असते याची सर्वांनाच जाण आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हा संघ वर्चस्व गाजवण्याची धमक राखतो. त्यांच्याकडे एकाहून एक अधिक तुल्यबळ खेळाडू आहेत. विराट आणि माझी मैत्री अनेक वर्षांपूर्वीची आहे. तो क्षण खूप खास होता आणि आमची मैत्री व नातं क्रिकेट खेळापेक्षाही अधिक भक्कम आहे. याची जाण आम्हा दोघांना आहे.''
भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळून न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा केल्या. भारताचा दुसरा डावही १७० डावांवर गडगडला अन् किवींनी १३९ धावांचे लक्ष्य २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. रॉस टेलर व केन यांनी संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. केननं पहिल्या डावात ४९ आणि दुसऱ्या डावात नाबाद ५२ धावा केल्या. केन म्हणाला,''दोन्ही संघ तुल्यबळ होते आणि सामनाही चुरशीचा झाला. संपूर्ण सामन्यात असं वाटत होतं की ही लढत चाकूच्या टोकावर सुरू आहे. दोन्ही संघांकडून दमदार खेळ झाला. कोणाला ट्रॉफी मिळते आणि एका संघाची झोळी रिकामी राहते.''