Kane Williamson, NZ vs PAK test: आधी स्टीव्ह स्मिथ, नंतर चेतेश्वर पुजारा आणि डेव्हिड वॉर्नर... एका पाठोपाठ एक जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांनी दीर्घ काळापासून सुरू असलेली कसोटी क्रिकेटमधील शतकांची प्रतिक्षा संपवली. आता वर्षातील शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा सर्वोत्तम फलंदाज केन विल्यमसन यानेही कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. माजी कर्णधार विल्यमसनने तब्बल ७२२ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कारकिर्दीतील २५वे शतक पूर्ण केले आणि संघाला मजबूत स्थितीत आणले.
या कसोटी मालिकेपूर्वी विल्यमसनने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता, जेणेकरून त्याला फलंदाजीत चांगली कामगिरी करता यावी. या निर्णयाचा परिणाम दिसून आला आणि पहिल्याच डावात विल्यमसनने पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या विल्यमसनने शेवटच्या सत्रात २०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. योगायोगाने विल्यमसनचे यापूर्वीचे शतकही पाकिस्तानविरुद्धच आले होते. त्याने जानेवारी २०२१ मध्ये क्राइस्टचर्च कसोटीत पाकिस्तानविरुद्ध २३८ धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती. तेव्हापासून विल्यमसन शतकासाठी आतुर झाला होता.
विल्यमसनचा नवा पराक्रम
विल्यमसनची बॅट पाकिस्तानविरुद्ध सतत धाव करत आहे. त्याने या संघाविरुद्ध २३ डावांमध्ये पाचवे शतक झळकावले. केवळ पाकिस्तानविरुद्ध त्याने कसोटीत एक हजारांहून अधिक धावा (सुमारे १,४००) केल्या आहेत. एवढेच नाही तर या शतकासह विल्यमसनने असा पराक्रम केला आहे, जो ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, स्टीव्ह स्मिथ, जो रूट सारखे महान फलंदाजही करू शकले नाहीत. विल्यमसन भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये कसोटी शतके झळकावणारा पहिला बिगर-आशियाई फलंदाज ठरला आहे. विल्यमसनने UAE मध्येही २ शतके झळकावली आहेत, जिथे पाकिस्तानने त्यांचे अनेक कसोटी सामने खेळले होते.
कसोटीत न्यूझीलंडचे वर्चस्व
विल्यमसनचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा असून त्याची सुरुवात अप्रतिम झाली आहे. त्याच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात पाकिस्तानचा ४३८ धावांपर्यंत मजल मारली. २ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४४० धावा केल्या. विल्यमसन १०५ धावा करून नाबाद राहिला. विल्यमसन व्यतिरिक्त टॉम लॅथमने देखील न्यूझीलंडसाठी उत्कृष्ट खेळी खेळली आणि ११३ धावा केल्या, तर डेव्हॉन कॉनवेचे शतक हुकले. तो ९२ धावा करून बाद झाला.