Kane Williamson SRH Captaincy, IPL 2022 : हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्स विरूद्ध मंगळवारच्या सामन्यात ३ धावांनी थरारक विजय मिळवला. सामना सुरू होण्याआधी त्यांचा संघ ८व्या स्थानी होता. सामना जिंकल्यावरही त्यांचा संघ ठिकाणी कायम राहिला. आता साखळी फेरीतील शेवटच्या दिवशी त्यांचा शेवटचा सामना पंजाबविरूद्ध आहे. त्यासामन्यात विजय मिळवल्यास आणि चांगला नेट रन रेट राखल्यास त्यांना प्ले-ऑफचे तिकीटही मिळू शकते. त्यामुळे प्ले-ऑफमध्ये चुरस रंगली असतानाच SRH चा कर्णधार केन विल्यमसन याने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि त्याने IPLचा बायोबबल सोडून मायदेशी परतणार असल्याचे कळले.
हैदराबादच्या संघाविरोधात हंगामाच्या सुरूवातीपासून रोष व्यक्त केला जात होता. डेव्हिड वॉर्नरसारख्या स्टार खेळाडूला अतिशय वाईट वागणूक दिल्यामुळे त्याने नव्या हंगामात दिल्लीकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर SRHच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तशातच SRH चे नेतृत्व करणाऱ्या केन विल्यमसनने देखील आता शेवटचा निर्णायक सामना शिल्लक असताना अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. SRH चे व्यवस्थापन केन विल्यमसनशीदेखील वाईट वागले का? असा प्रश्न विचारला जात आहे. पण तसं काहीही घडलेलं नाही. केन विल्यमसन याच्या पत्नीने दुसऱ्या बाळाला जन्म दिला असल्याने विल्यमसन मायदेशी परतत असल्याची माहिती आहे.
केन विल्यमसन नसताना कर्णधार कोण?
विल्यमसन बायो-बबलमधून बाहेर जाणार असल्याने तो जरी परत आला तरी त्याला ३ दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन असणार आहे. त्यामुळे तो शेवटचा साखळी सामना खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत शेवटच्या सामन्यात हैदराबादकडे कर्णधारपदासाठी दोन पर्याय आहेत. भुवनेश्वर कुमारने आधीही संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे तो एक पर्याय ठरू शकतो. त्याशिवाय, नुकताच विंडिजचा कर्णधार झालेल्या निकोलस पूरनलाही ही संधी दिली जाऊ शकते.