वेलिंग्टन : केन विल्यमसनने न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. न्यूझीलंड क्रिकेटने गुरुवारी सांगितले की, केन विल्यमसनने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी कसोटीत संघाचे नेतृत्व करणार आहे. टॉम लॅथम उपकर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळेल. केन विल्यमसन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करीत राहणार आहे.
३२ वर्षीय केन विल्यमसनने एक निवेदन प्रसिद्ध करत सांगितले की, ‘वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंडचा ३१वा कसोटी कर्णधार असेल. साऊदीच्या नेतृत्वाखाली, किवी संघ या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानचा दौरा करेल. कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर केन विल्यमसनने सहा वर्षांनी या पदाचा राजीनामा दिला. २०१६ मध्ये त्याच्याकडे ब्रेंडन मॅक्युलमनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. विल्यमसनने ४० कसोटी सामन्यांमध्ये किवी संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान २२ कसोटी सामने जिंकले.विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने गेल्या वर्षी विश्व कसोटी चॅम्पियनशिप २०२१ जिंकली होती.
कसोटी कर्णधार बनणे गर्वाची बाब आहे. कसोटी क्रिकेट सर्वांत अवघड आव्हान असते. या प्रकारात नेतृत्व करण्यास मी इच्छुक असून केनचे काम पुढे नेण्याचा माझा निर्धार असणार आहे.- टीम साऊदी नवा कर्णधार