India vs New Zealand 3rd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. यजमानांना मालिका वाचवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचा आहे आणि त्यात त्यांना धक्का बसला आहे. कर्णधार केन विलियम्सन ( Kane Willliamson) याने तिसऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. मॅकलीन पार्कवर मंगळवारी होणाऱ्या लढतीत टीम साऊदी किवींचे नेतृत्व करणार आहे. केन विलियम्सनच्या जागी संघात मार्क चॅपमॅनची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवारपासून ऑकलंडला होणाऱ्या वन डे मालिकेसाठी केन पुन्हा किवी संघात दाखल होईल. केनला कोपऱ्याच्या दुखापतीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आणि त्याकरीता तो तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही, असे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले. ते म्हणाले, वैद्यकीय वेळ मिळवण्यासाठी केन बऱ्याच दिवसापासून प्रयत्नशील होता आणि त्यानंतर त्याला डॉक्टरांनी वेळ दिली आहे. खेळाडू व सपोर्ट स्टाफचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
भारत-न्यूझीलंड पहिली मॅच पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ६५ धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद १११ धावांच्या जोरावर भारताने १९१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दीपक हुडाने चार विकेट्स घेत किवींचा डाव १२६ धावांत गुंडाळला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"