NZ vs SA ( Marathi News ): दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर ५२८ धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात ५११ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर गुंडाळून किवींनी सामन्यावर पकड घेतली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने ४ बाद १७९ धावा करून आघाडी ५२८ धावांपर्यंत नेली आहे. माजी कर्णधार केन विलियम्सनने किवींसाठी दोन्ही डावांत शतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली.
३३ वर्षीय केनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली आहेत. त्याने मागील १० डावांमध्ये ६ शतके झळकावली आहेत. या फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात ११८ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो १०९ धावा करून बाद झाला. केन विलियम्सनचे हे कसोटीतील ३१वे शतक ठरले आणि सर्वात कमी इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरने १६५ इनिंग्जमध्ये ३१ शतकं झळकावली होती, तर स्टीव्ह स्मिथ व केन यांना हा टप्पा ओलांडण्यसाठी १७० इनिंग्ज खेळल्या आहेत.
६ फेब्रुवारी २०२० मध्ये विराट कोहली २७ कसोटी शतकांसह आघाडीवर होता आणि तेव्हा केनची २१ शतकं होती. पण, चार वर्षानंतर विराटची कसोटी शतकं २९ झाली आहेत आणि केन ३१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक ५ शतकं झळकावणाऱ्या किवी फलंदाजाचा मान केनने पटकावला आहे. २०१३ नंतर कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा तो पहिलाच किवी फलंदाज ठरला आहे.
डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी... केन विलियम्सनने घरच्या मैदानावर कसोटीत १८वे शतक झळकावून सर डॉन ब्रँडमन व जो रूट यांच्या ( घरच्या मैदानवार १८ कसोटी शतकं) विक्रमाशी बरोबरी केली. माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस व रिकी पाँटिंग यांनी घरच्या मैदानावर सर्वाधिक २३ शतकं झळकावली आहेत. केनने घरच्या मैदानावर ४६ कसोटींत ६९.०३च्या सरासरीने ४४८७ धावा केल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड - पहिला डाव ५११ धावा ( रचीन रवींद्र २४०, केन विलियम्सन ११८; नेल ब्रँड ६-११९), दुसरा डाव ४ बाद १७९ धावा ( केन विलियम्सन १०९; नेल ब्रँड २-५२) वि. दक्षिण आफ्रिका पहिला डाव - सर्वबाद १६२ धावा ( कीगन पीटरसन ४५; मॅट हेन्री ३-३१, मिचेल सँटनर ३-३४ )