Join us  

विल्यमसनची लक्ष्मणसारखी खेळी, न्यूझीलंडचं फॉलोऑननंतर जोरदार कमबॅक, कसोटी रंगतदार स्थितीत

Kane Williamson : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. इंग्लंडला विजयासाठी २१० धावांची गरज आहे. तर न्यूझीलंडला विजयासाठी ९ विकेट्स काढाव्या लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 2:31 PM

Open in App

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. फॉलोऑनची नामुष्की ओढवल्यानंतर दुसऱ्या डावात खेळताना केन विल्यमसनने केलेल्या व्ही.व्ही. एस. लक्ष्मणसारख्या झुंजार खेळीमुळे कसोटीत जोरदार पुनरागमन केलं. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ४८३ धावांपर्यंत मजल मारत इंग्लंडसमोर विजयासाठी २५८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने १ बाद ४८ धावा काढल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी २१० धावांची गरज आहे. तर न्यूझीलंडला विजयासाठी ९ विकेट्स काढाव्या लागतील.

इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या ४३५ धावांना प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडचा पहिला डाव २०९ धावांत गारद झाला होता. त्यामुळे यजमान संघावन फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती. मात्र फॉलोऑन खेळताना न्यूझीलंडच्या संघाने जिगरबाज खेळ केला. टॉम लॅथम (८३) आणि डेवॉन कॉनवे (६१) यांनी  न्यूझीलंडच्या संघाला शतकी सलामी दिली. तर त्यानंतर केन विल्यमसनने २००१ मध्ये कोलकाता कसोटीत व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने केलेल्या अविस्मरणीय खेळीसारखी खेळी करत न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. 

विल्यमसनने १३२ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील २६ वे शतक फटकावले. विल्यमसनला टॉम ब्लंडेलने सुरेख साथ दिली. ब्लंडेलने ९० धावांची खेळी केली. या दोघांनीही सहाव्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला साडेचारशेपार मजल मारून दिली. मात्र विल्यमसन बाद झाल्यानंतर ब्लंडेलला न्यूझीलंडच्या शेपटाकडून अपेक्षित साध मिळाली नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव ४८३ धावांवर आटोपला. मात्र तोपर्यंत न्यूझीलंडने २५७ धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर तगडे आव्हान उभे केले.

या आव्हानाचा पाठलाग करताना जॅक क्राऊलीच्या रूपात इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. क्राईलीला २४ धावांवर असताना टीम साऊदीने बाद केले. आता बेन डकेट २३ आणि ओली रॉबिन्सन १ धावावर खेळत आहेत. अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २१० धावांचीची गरज आहे.  

टॅग्स :केन विल्यमसनन्यूझीलंडइंग्लंड
Open in App