दुबई : एका झुंजार योध्याप्रमाणे आपल्या संघाचे पुढे राहून नेतृत्त्व करताना केन विलियम्सनने टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडला मजबूत स्थिती मिळवून दिली. विलियम्सने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १७२ धावा उभारल्या. विलियम्सनने ४८ चेंडूंत ८५ धावा काढताना १० चौकार व ३ षटकार मारले.
यंदाच्या स्पर्धेतील नाणेफेकीचा इतिहास पाहताना प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाची बाजू वरचढ ठरली आहे. मात्र, नाणेफेक गमावल्याने न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीला यावे लागले. परंतु, किवींनी जणू काही या परिस्थितीला तोंड देण्याची मजबूत पूर्वतयारी केली होती. मार्टिन गुप्टिल (२८) आणि डेरिल मिशेल (११) यांनी संघाला वेगवान सुरुवात करुन दिली.
जोश हेझलवूडने मिशेलला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर सुरु झाला तो कॅप्टन विलियम्सनचा शो. विलियम्सनने अनुभवी गुप्टिलसह सावध पवित्रा घेत संघाची पडझड होऊ दिली नाही. संघाची धावगती कमी झाल्याचे पाहून संधी मिळताच दोघांनी आक्रमक पवित्रा घेतला. विशेष करुन विलियम्सनने आक्रमणाची सूत्रे आपल्याकडे घेत मिशेल स्टार्कवर तुफानी हल्ला चढवला. विलियम्सनच्या फटकेबाजीपुढे लय गमावलेल्या स्टार्कने ४ षटकांत ६० धावांची खैरात केली. ऑसीकडून यशस्वी गोलंदाज ठरला तो जोश हेझलवूड. त्याने ४ षटकांत केवळ १६ धावा देत किवींचे आघाडीचे तीन फलंदाज बाद केले.
फिरकीपटू अॅडम झम्पाने गुप्टिलला बाद केल्यानंतर ग्लेन फिलिप्सने विलियम्सनला चांगली साथ दिली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत संघाची धावगती उंचावली. त्यांनी ३७ चेंडूंत ६८ धावांची जबरदस्त भागीदारी करत कांगारुंवर दडपण आणले. फिलिप्स (१८) आणि विलियम्सन चार धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर कांगारुंनी टिच्चून मारा करत किवींना मोठ्य धावसंख्येपासून काहीप्रमाणात रोखले.
महत्त्वाचे
n टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. या आधी २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने १६१ धावा केल्या होत्या.
n टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा विलियम्सन श्रीलंकेच्या कुमार संगाकारानंतरचा (२००९) दुसरा कर्णधार ठरला.
n केन विलियम्सनने टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यातील वेगवान अर्धशतक झळकावले.
n टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वाधिक केन विलियम्सनने विंडीजच्या मार्लोन सॅम्युअल्सच्या सर्वाधिक धावांच्या खेळीच्या विक्रमाशी केली बरोबरी. सॅम्युअल्सची खेळी नाबाद असल्याने तो वरचढ ठरला.
n किवींनी पहिल्या १० षटकांत ५७ धावा केल्यानंतर पुढील ५७ धावा केवळ ५ षटकांत फटकावल्या.
n यंदाच्या स्पर्धेत दिवस-रात्र सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दोघांनाही विजय मिळवता आलेला नाही.
n मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवून यांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला.
n यंदाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने सहाव्यांदा नाणेफेक जिंकली.
n यंदाच्या स्पर्धेत सुपर-१२ फेरीत पॉवर प्लेमध्ये जोश हेझलवूडने सर्वाधिक ७ बळी घेत बांगलादेशच्या मुजीब उल रहमान आणि इंग्लंडच्या ख्रिस वोक्स (प्रत्येकी ६ बळी) यांना मागे टाकले.
n या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीच्या सर्व नॉकआऊट सामन्यात विजय.
Web Title: The Kangaroos were overwhelmed by Williamson's footsteps
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.