कानपूर - भारताचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमाचे अजून एक शिखर सर केले आहे. कानपूर वनडेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अवघे 202 सामने आणि 194 डावांमध्ये नऊ हजार धावा पूर्ण करत विराटने सर्वात वेगात नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा आपला विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याबरोबरच विराटने 205 डावांत नऊ हजार धावा पूर्ण करण्याचा एबी डीव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधील नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी विराट कोहलीला 83 धावांची गरज होती. दरम्यान, विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने आज तो या विक्रमाला सहज गवसणी घालेल, अशी अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे विराटने या सामन्यातही दमदार कामगिरी करत किवी गोलंदाजांची धुलाई केली. तसेच शानदार शतकी खेळी करताना नऊ हजार धावांचा मैलाचा दगड पार केला.
विराटच्या आधी सर्वात जलद नऊ हजार धावा फटकावण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी. डीव्हिलियर्सच्या नावे होता. त्याने 205 डावांत 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर भारतातर्फे सौरव गांगुलीने सर्वात जलद 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. गांगुलीने 228 डावांत 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने फटकावलेल्या झंझावाती शतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडसमोर 338 धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटने केलेली द्विशतकी भागीदारी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधवने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात 6 बाद337 धावा फटकावल्या.