Virat Kohli vs BCCI: विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (BCCI) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार कपिल देव यांनी एक मोलाचा सल्ला देऊ केला आहे. बीसीसीआय आणि कोहली यांनी संवाद साधून सर्व गुंता सोडवला पाहिजे. दोघांसाठीही देश हेच पहिलं प्राधान्य असायला हवं, त्यानंतर वैयक्तिक मुद्दे, असं कपिल देव म्हणाले.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विराट कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर बीसीसीआयनं कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं आणि क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवली. त्यानंतर कोहलीनं आता द.आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर कसोटी संघाचंही कर्णधारपद सोडलं आहे.
दरम्यान, वनडे संघाच्या कर्णधारपदाबाबत कोहलीला ४८ तासांचा वेळ देण्यात आला होता असं बीसीसीआयनं म्हटलं आहे. तर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला कोहलीला दिला होता असं म्हटलं होतं. पण कोहलीनं आपल्याशी कुणीही याबाबत चर्चा केली नव्हती असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. यानंतर कोहली आणि गांगुलीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली.
कपिल देव यांनी दिला मोलाचा सल्लाकोहली आणि बीसीसीआयमधील वादात आता कपिल देव यांनी उडी घेत वातावरण लवकर शांत होणं गरजेचं असून दोघांमध्ये संवादातून सारे प्रश्न सुटतील असं म्हटलं आहे.
"ज्यावेळी कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं त्यावेळी कुणीही असा विचार केला नसेल की कोहलीच्या मनात इतकं काही सुरू आहे. कोहलीनं कर्णधारपद सोडावं असं कुणालाच अपेक्षित नव्हतं. तो एक सर्वोत्तम खेळाडू आहे. आपण त्याच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा", असं कपिल देव म्हणाले.
कोहली आणि बीसीसीआयमध्ये जो काही वाद किंवा गैरसमज असेल तर तातडीनं दूर व्हायला हवा. एक फोन कॉल करावा. एकमेकांशी मनमोकळेपणानं जे काही आहे ते बोलावं आणि विषय मिटवावा. देश आणि संघ या दोन्ही गोष्टी वैयक्तिक गोष्टींपेक्षा खूप मोठ्या आहेत, असं कपिल देव म्हणाले.
"सुरुवातीला मलाही सर्व मिळालं जे मला हवं होतं. पण कधी कधी तुम्हाला जे हवं असतं ते मिळत नाही. याचा अर्थ आपण लगेच कर्णधारपद सोडावं असंही होत नाही. पण यामागे काही विविध कारणांमुळे कर्णधारपद सोडणं आपण समजू शकतो. तो एक शानदार खेळाडू आहे. मला आणि देशाला त्याला आणखी खेळताना पाहायचं आहे", असं कपिल देव म्हणाले.