Kapil Dev Team India: टीम इंडियाची युवा ब्रिगेड सध्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. भारतीय संघ मालिकेत १-२ ने पिछाडीवर असला तरी या मालिकेकडे टी२० विश्वचषकाची तयारी म्हणून पाहिले जात आहे. याच दरम्यान माजी कर्णधार कपिल देव यांनी युवा खेळाडूंवर भाष्य केले आहे. कपिल देव यांनी संघाच्या यष्टीरक्षकांबद्दल आणि टी२० वर्ल्ड कपबाबत मत व्यक्त केले. कपिल देव यांनी ऋषभ पंत, इशान किशन, दिनेश कार्तिक आणि संजू सॅमसन यांच्याबद्दल आपली मतं रोखठोकपणे मांडली.
" दिनेश कार्तिक, इशान किशन आणि संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर ते तिघे एकाच पद्धतीचा खेळ करणारे आहेत. तिघांची फलंदाजी करण्याची पद्धत वेगळी आहे, पण ते चांगले यष्टिरक्षक फलंदाज आहेत. वृद्धिमान साहा सर्वोत्तम आहे पण तो या सर्वांपेक्षा खूप वरिष्ठ आहे. संजू सॅमसनकडे खूप चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. पण त्याच्याकडे त्याची एक अडचण म्हणजे तो फक्त एक-दोन सामन्यात धावा करू शकतो आणि नंतर अपयशी ठरतो", अशा शब्दांत कपिल देव यांनी संजू सॅमसनच्या फलंदाजीबाबत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्या टी२० मालिकेत संजू सॅमसनची निवड झाली नाही. त्याने राजस्थानच्या संघाला IPL मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारू दिली. पण तरीही त्याला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने त्याची बरीच चर्चा झाली. संजू सॅमसनने आयपीएलच्या या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी खूप धावा केल्या. पण निवड समितीने त्याला संधी दिली नसल्याने नेटकऱ्यांनीही BCCI वर टीका केली होती.