नवी दिल्ली-
श्रीलंकेविरोधात सुरू झालेली ट्वेन्टी-२० सीरिज भारतीय संघासाठी परिवर्तनाची लाट घेऊन येऊ शकते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघासमोर आता वनडे वर्ल्डकप आणि ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसारखी मोठी स्पर्धा देखील आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच आता भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार कपिल देव यांनी एक मोठं विधान केलं आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भरवशावर वर्ल्डकपचं स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर असं होऊ शकत नाही. कारण फक्त एक-दोन खेळाडूंच्या जोरावर तुम्ही वर्ल्डकप जिंकू शकत नाही, असं कपिल देव म्हणाले.
एका मुलाखतीत बोलताना कपिल देव म्हणाले की, तुम्हाला जर वर्ल्डकप जिंकायचा असेल तर प्रशिक्षक, सिलेक्टर आणि कर्णधार यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. वैयक्तिक फायद्यांचा विचार न करता संघासाठी विचार करावा लागेल. तुम्ही विराट किंवा रोहित यांसारख्या २-३ खेळाडूंच्या जोरावर वर्ल्डकप जिंकणं शक्य नाही. तुम्हाला टीमवर विश्वास ठेवावा लागेल, कारण आपल्याकडे अशी टीम आहे की ज्यात मॅन विनर्स खेळाडू आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल.
टीम इंडियानं जवळपास गेल्या दशकभरात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळेच प्रत्येकाचं वर्ल्डकप स्पर्धेकडे लक्ष आहे. भारतीय संघानं शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ साली जिंकली होती. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. २०२२ सालच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
आता २०२४ सालच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून हार्दिक पंड्याकडे नवा ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. तसंच ट्वेन्टी-२० टीममधून सिनिअर खेळाडूंना संघाबाहेर करण्याचाही विचार केला जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांसारख्या सिनिअर खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सीरिजसाठी आराम देण्यात आला आहे.