मुंबई : भारताचे माजी विश्वविजयी कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयमधील क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनाम दिला आहे. कपिल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती. आता क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे शास्त्री यांचे प्रशिक्षकपद धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.
येत्या काही दिवसांमध्ये टीम इंडिया मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण बीसीसीआयने शास्त्री यांची ज्यांनी निवड केली त्या क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. जर या नोटीशीला या सदस्यांना योग्य ते उत्तर देता आले नाही, तर शास्त्री यांची निवड रद्द होऊ शकते. क्रिकेट सल्लागार समितीमधील कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी यांना बीसीसीआयने परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर त्यांना या नोटीशीला उत्तर पाठवण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे.
शांता यांच्यानंतर आज कपिल यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जर एखाद्या समितीचा अध्यक्ष राजीनामा देतो, तर त्या समितीने घेतलेला निर्णय ग्राह्य धरायचा किंवा नाही, याबाबतचा निर्णय आता बीसीसीआय घेणे भाग आहे. आपण पारदर्शी निर्णय घेतो, असे बीसीसीआयने यापूर्वीही दाखवून दिले आहे. त्यामुळे आता कपिल यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या समितीने घेतलेला निर्णय ग्राह्य धरायचा की नाही, यावर आता शास्त्री यांचे भवितव्य अवलंबून आहे.