1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात महत्वाचे योगदान देणारे दिग्गज ऑलराउंडर कपिल देव यांनी माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या एक वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज योगराज सिंग यांनी दावा केल होता की, कपिल देव यांनी त्यांना भारतीय संघातून बाहेर केल्याने ते नाराज झाले होते आणि यानंतर पिस्तुल घेऊन कपिल देव यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. माजी क्रिकेटर योगराज सिंग यांच्या या दाव्यावर माजी कर्णधार कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कपिल देव यांची प्रतिक्रिया -योगराज सिंग यांच्या खळबळ उडवून देणाऱ्या या दाव्यासंदर्भात कपिल देव यांचीही प्रतिक्रिया आली आहे. कपिल देव यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. योगराज यांच्या दाव्यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कपिल म्हणाले, "कोण, आपण कुणासंदर्भात बोलत आहात?" यावर एक रिपोर्टर म्हणाला, युवराजचे वडील, यावर कपिल म्हणाले, "अच्छा, आणखी काही?" आणि यानंतर ते निघून गेले.
नेमकं काय म्हणाले होते योगराज सिंग? -योगराज सिंग यूट्यूब चॅनल 'अनफिल्टर्ड बाय समदिश' सोबत बोलताना म्हणाले, "जेव्ह कपिल देव भारत, उत्तर विभाग आणि हरियाणाचे नेतृत्व करत होता, तेव्हा त्याने मला कुठलेही कारण नसताना संघातून बाहेर केले. यासंदर्भात मी कपिलला विचारणा करावी, अशी माझ्या पत्नीची इच्छा होती. मी तिला म्हणालो, या माणसाला मी धडा शिकवणार. यानंतर, मी माझे पिस्तूल काढले आणि चंदीगडमधील सेक्टर 9 मध्ये कपिलच्या घरी पोहोचलो. तो आईसोबत घराबाहेर आला. मी त्याला शिवीगाळ केली. मी त्याला म्हणालो की, तुझ्यामुळे मी एक मित्र गमावला आहे आणि तू जे केलेस त्याची किंमत तुला मोजावी लागेल. मला तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे. पण मी तसे करणार नाही. कारण तुझ्या जवळ देवावर विश्वास असणारी तुझी आई उभी आहे."