नवी दिल्ली : ‘निवृत्तीनंतर माझ्याकडे मर्यादित पर्याय होते. काय करायचे सुचत नव्हते. अशावेळी खेळणे सोडण्याच्या अखेरच्या टप्प्यात कपिल देव यांनी प्रशिक्षणाकडे वळण्याचा मोलाचा सल्ला दिला. ‘वेळेचे ध्यान ठेवून तुला कुठली गोष्ट पसंत आहे, हे तपासून घे. त्यानंतर खेळाशी जुळलो आहे की नाही, याचा शोध घे,’ असे त्यांनी सांगितले. मी सुरुवातीला समालोचन करीत राहिलो. पण खेळापासून दूर असल्याचे ध्यानात येताच पुन्हा प्रशिक्षणाचे क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला,’ असे माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविड याने शनिवारी सांगितले.
महान कपिल देव यांचा सल्ला निवृत्तीनंतरच्या वाटचालीत मोलाचा ठरल्याची माहिती डब्ल्यू. व्ही. रमण यांच्या यू ट्यूब चॅनलवरील ‘इनसाईड आऊट’ कार्यक्रमात द्रविडने दिली. तो म्हणाला, ‘निवृत्तीनंतर कपिल यांच्या सल्ल्यामुळे भारत अ आणि अंडर १९ संघाचा प्रशिक्षक बनू शकलो. त्याआधी, करिअरच्या अखेरच्या टप्प्यात मी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि सहप्रशिक्षक राहिलो होतो.
तो पुढे म्हणाला, ‘कोचिंगचा विकास करण्यात मदत करताना मला छान वाटते. भारत अ, १९ वर्षांखालील संघ आणि राष्टÑीय क्रिकेट अकादमी या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक दिग्गजांसोबत काम करण्याचा आणि नव्या चेहऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा योग आला. यादरम्यान झटपट निकालाची चिंता केली नाही. माझ्या मते, काम करण्यासाठी मी निवडलेले क्षेत्र चांगलेच आहे.’
१९ वर्षांखालील खेळाडूंना विश्वचषकासाठी तयार करण्याच्या बीसीसीआयच्या भूमिकेचे द्रविडने समर्थन केले शिवाय एनसीएत एकाचवेळी ४५ ते ५० खेळाडूंना अत्याधुनिक सुविधांचा आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वृत्तसंस्था)‘मला ज्या गोष्टी आवडल्या त्यात खेळाशी जुळणे आणि खेळाडूंच्या संपर्कात राहणे या होत्या. प्रशिक्षणासारखे क्षेत्र फार आवडायला लागल्यामुळे ज्युनियर भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारताना आनंद झाला होता. सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी होती. मी ती स्वीकारली. आतापर्यंत मी या कामाचे समाधान आणि आनंद उपभोगला आहे,’ असे मत देशासाठी १९९६ ते २०१२ या कालावधीत १६४ कसोटीत १३,२८८ धावा करणाºया द्रविडने व्यक्त केले.