मुंबई, दि. 29- टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफवर सोशल मीडियातून टीका होते आहे. मोहम्मद कैफने त्याच्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो पोस्ट केल्याने त्याला टीकेचा धनी व्हावं लागतं आहे. कैफने मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो शेअर करून त्याला #सदरंजकेखिलाडी, #फादरसन, #कबिरटेल्स, #इन्स्टाप्ले, असे हॅशटॅग्स दिले आहेत. मोहम्मद कैफने फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच काही जणांनी त्याच्या फोटोवर कमेंट करून त्याच्यावर टीका केली आहे. बुद्धीबळ खेळणं इस्लाम धर्माच्या विरोधातील असल्याचं मत नेटीझन्सने कमेंटमधून व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी बुद्धीबळ खेळणं हराम असल्याचं मत व्यक्त केलं आहे. कैफवर सोशल मीडियावर टीका होत असताना काही नेटीझन्सने कैफला समर्थनही दर्शविलं आहे.
कैफवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मोहम्मद कैफवर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार झाला होता. सुर्यनमस्कार करतानाचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. सुर्यनमस्कार करतानाच्या फोटोवर त्याने दिलेलं कॅप्शन आक्षेपार्ह असल्याचं काही जणांनी म्हंटलं होतं. तर टी-शर्ट आणि पॅन्ट घालणं, हे इस्लाम विरोधातील असल्याचं मत काही जणांनी व्यक्त केलं होतं. इस्लाम धर्मात सुर्यनमस्कार करण्याला 100 टक्के मनाई आहे. आपण 'अल्लाह' व्यतिरिक्त इतर कोणासमोरही झुकू शकत नाही, असं मत काही कट्टरतापंथीयांनी व्यक्त केलं होतं.मोहम्मद कैफच्या फोटोवर टीका करणाऱ्या लोकांना एका युजरने कैफचं समर्थन करत उत्तर दिलं आहे. बुद्धीबळ खेळणं हराम आहे, क्रिकेट हराम आहे, झोपणं हराम आहे, पीणं हराम आहे, फक्त धर्म सगळ्यात चांगला आहे, अशा शब्दात एका युजरने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
Surya Namaskar is a complete workout fr the physical system,a comprehensive exercise form without any need fr equipment.#KaifKeFitnessFundepic.twitter.com/snJW0SgIXM
— Mohammad Kaif (@MohammadKaif) December 31, 2016
इरफान पठाणवरही झाली टीका टीम इंडियाचा फास्ट बॉलर रफान पठाणला आपल्या पत्नीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केल्यामुळे ट्रोल करण्यात आलं. फेसबुकवर टाकलेल्या फोटोत इरफानची पत्नी सफाने आपला अर्धा चेहरा हाताने झाकला आहे. नखांना लावलेलं नेलपॉलिश, अर्धवट झाकलेले हात यामुळे इरफानला त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. तू पठाण आहेस, आणि एका पठाणाने आपल्या पत्नीसोबतचे असे फोटो टाकणं गैर असल्याचं इरफानच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं आहे. "दिस गर्ल इस ट्रबल" (ही मुलगी संकट आहे) असं कॅप्शनही त्याने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे या फोटोवरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. हाच फोटो इरफारनने ट्विटरवरही शेअर केला आहे. कुछ तो लोग कहेंगे. लोगोका काम है कहना, असं कॅप्शन दिलं होतं.
शामीवरही झाली होती टीकाकाही दिवसांपुर्वी भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने फेसबूक आणि ट्टिवरवर आपली पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावरुन शामीला धर्म आणि संस्कृतीच्या रक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. शामीच्या पत्नीने घातलेल्या कपड्यांवरुन टीका करत पुढच्या वेळी हिजाब परिधान करुन फोटो काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही लोक तर शामीला आपल्या पत्नीला ताब्यात ठेवायला जमत नसल्याचंही बोलले होते. तर काहींनी शामीच्या मुसलमान होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.