आयपीएल २०२२ ला येत्या शनिवारपासून सुरू होईल. यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार का, असा प्रश्न प्रत्येक हंगाम सुरू असताना चाहत्यांना पडतो. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनं सर्वाधिकवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. मात्र असाही एक खेळाडू आहे, जो चारवेळा आयपीएल विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. विशेष म्हणजे तीन वेगवेगळ्या संघाकडून त्यानं ही कामगिरी केली आहे.
यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या कर्ण शर्माच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लिलावात त्याच्यासाठी ५० लाख रुपयांची बोली लागली. कर्ण शर्माची बेस प्राईजदेखील तितकीच होती. आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून कर्ण शर्माची कामगिरी फारशी उत्तम नाही. मात्र तो चारवेळा विजेत्या संघाचा भाग राहिला आहे.
२०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादनं आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. त्यावेळी कर्ण शर्मा त्याच संघात होता. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सनं जेतेपद पटकावलं. त्यावेळी कर्ण मुंबईच्या संघाचा भाग होता. २०१८ ते २०२१ या कालावधीत कर्ण चेन्नई सुपर किंग्सचा घटक होता. २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईच्या संघानं जेतेपद मिळवलं.
आता कर्ण शर्मा अशा संघाचा भाग आहे, ज्या संघानं एकदाही जेतेपट जिंकलेलं नाही. त्यामुळे कर्णमुळे संघाचं नशीब पालटणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यामुळे यंदा फाफ डू प्लेसिस आरसीबीचं नेतृत्त्व करणार आहे.