अभिमन्यू मिथूनच्या भेदक माऱ्यानंतर लोकेश राहुल व देवदत्त पडीक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कर्नाटक संघानं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत हरयाणावर विजय मिळवला. हरयाणानं विजयासाठी ठेवलेलं 195 धावांच लक्ष्य कर्नाटकनं 8 विकेट आणि 30 चेंडू राखून पार केले. या खेळीसह कर्नाटकनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवला.
या सामन्यात कर्नाटकच्या अभिमन्यू मिथूननं अखेरच्या षटकात पाच विकेट्स घेतल्या. त्यात हॅटट्रिकचा समावेश आहे. त्याच्या या गोलंदाजीनंतरही हरयाणा संघानं 20 षटकांत 8 बाद 194 धावा केल्या. पण, या सामन्यात मिथूननं अखेरच्या षटकात घेतलेले पाच बळी लक्षवेधी ठरली. प्रथम फलंदाजी करताना हरयाणाच्या फलंदाजांची फटकेबाजी पाहायला मिळाली. चैतन्य बिश्नोईनं 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या. त्याला हर्ष पटेलनं 34 धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर हिमांशू राणा आणि राहुल तेवाटिया यांनी दमदार खेळ केला. हिमांशूनं 34 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचत 61 धावा केल्या. राहुलनं 32 धावा केल्या.
हरयाणाचा संघ दोनशे धावांचा पल्ला सहज पार करेल असे वाटत होते. पण, अभिमन्यू मिथूननं अखेरच्या षटकात पहिल्या चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्यानं अखेरच्या चेंडूवर विकेट घेत, एकाच षटकात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. रणजी करंडक, विजय हजारे चषक आणि सय्यद मुश्ताक अली चषक या तीनही स्पर्धांमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानं 2009मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी स्पर्धेत, 2019मध्ये तामीळनाडू विरुद्ध विजय हजारे स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवली होती.
पाहा व्हिडीओ...
त्यानंतर 195 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या कर्नाटकला
लोकेश राहुल व देवदत्त पडीक्कल यांनी वादळी खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावा चोपल्या. लोकेशनं 31 चेंडूंत 4 चौकार व 6 षटकारांसह 66 धावा कुटल्या. देवदत्तनं 42 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकारांसह 87 धावांची खेळी केली. मयांक अग्रवालनं 14 चेंडूंत 3 षटकार खेचून नाबाद 30 धावा केल्या. कर्नाटकनं 15 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात 195 धावा करत विजय मिळवला. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात 15 किंवा त्यापेक्षा कमी षटकांत धावांचा पाठलाग करण्याचा हा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता. त्यांनी 2014मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 14.4 षटकांत 190 धावांचे लक्ष्य पार केले होते. याच वर्षी नेदरलँड्सने 13.5 षटकांत आयर्लंडचे 190 धावांचे लक्ष्य पार केले होते.
पाहा व्हिडीओ...
Web Title: Karnataka break Mumbai Indians record; enter into final in Syed Mushtaq Ali trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.