नवी दिल्ली : मयंक अग्रवालच्या ९० धावांच्या जोरावर कर्नाटकने सौराष्ट्रचा ४१ धावांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी विजय हजारे चषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे ही स्पर्धा कर्नाटकने तिस-यांदा जिंकली.
येथील फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून सौराष्ट्रने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकच्या संघाने ४५.५ षटकांत सर्वबाद २५३ धावा केल्या. मयंक अग्रवालने ७९ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९0 धावा केल्या. पवन देशपांडेने ४९ तर रवीकुमार समर्थने ४८ धावांचे योगदान दिले. सौराष्ट्रतर्फे कमलेश मकवाना सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३४ धावांत ४ गडी बाद केले. प्रेरक मंकडने २ तर शौर्य सनेंदिया आणि धमेंद्रसिंह जडेजाने प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात, सौराष्ट्रचा संघ ४६.३ षटकांत २१२ धावांत गारद झाला. चेतेश्वर पुजाराने कर्णधाराला साजेसी खेळी करत अखेरपर्यंत झुंज दिली. नवव्या गड्याच्या रूपात तो धावबाद झाला. त्याने १२७ चेंडूत १0 चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ९४ धावा केल्या. अवी बरोटने ३0 तर चिराग जानीने २२ धावांचे योगदान दिले. इतर कोणतेही खेळाडू कर्नाटकच्या भेदक माºयासमोर टिकाव धरू शकले नाहीत. कर्नाटकतर्फे प्रसिद्ध क्रिष्णा व क्रिष्णाप्पा गौथमने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर स्टुअर्ट बिन्नी आणि
पवन देशपांडेने प्रत्येकी १ गडी बाद केला. (वृत्तसंस्था)
श्रीनाथ अरविंदने घेतली निवृत्ती-
कर्नाटकचा वेगवान डावखुरा गोलंदाज श्रीनाथ अरविंद याने मंगळवारी प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अरविंदने २०१५ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध एकमेव टी-२० सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व करीत ४४ धावांत एक गडी बाद केला होता. त्याने ५६ प्रथमश्रेणी सामन्यात १८६ गडी बाद केले.
Web Title: Karnataka's third cricketer gets the third consecutive title, Srinath Arvind took the retirement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.