मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) गाडी सुसाट निघाली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखताना दिल्लीकरांनी प्ले ऑफचा उंबरठा जवळपास गाठलाच आहे. मात्र असे असले, तरी त्यांना आपल्या काही प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे चिंताग्रस्तही व्हावे लागले. सुरुवातीच्या सामन्यातच अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) खांद्याला दुखापत झाली होती.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर अश्विनन दमदार पुनरागमन केले. तसेच, नंतर आणखी एक हुकमी लेगस्पिनर अमित मिश्रालाही (Amit Mishra) दुखापत झाली. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला पूर्ण सत्राला मुकावे लागले. मात्र आता त्याच्या जागी नव्या खेळाडूची नियुक्ती झाली असून लवकरच तो मिश्राची जागा घेईल.
हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अमित मिश्राला अर्ध्यावरच यंदाच्या सत्रातून माघार घ्यावी लागली. आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी आणि सर्वात यशस्वी फिरकीपटू असलेल्या मिश्राच्या दुखापतीमुळे दिल्लीला मोठा धक्का बसला होता. आता त्याची जागा युवा लेगस्पिनर घेणार असून त्याचे नाव आहे, प्रवीण दुबे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाºया प्रवीणने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. २७ वर्षीय प्रवीणने आतापर्यंत १७ देशांतर्गत टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६.८७च्या इकॉनॉमी रेटने मारा करताना १६ बळीही घेतले आहेत.दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या प्रसिद्धि पत्रकनुसार, ‘दिल्ली कॅपिटल्सने २७ वर्षीय लेगस्पिनर प्रवीण दुबे याची अमित मिश्राचा बदली खेळाडू म्हणून संघात निवड केली आहे.’ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात अमित मिश्राला दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर तो उपचारासाठी भारतात परतला होता.