मुंबई : निदाहास ट्रॉफीमध्ये दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला आणि तो देशाचा नायक ठरला. त्याच्या या षटकाराच्या जोरावर भारताने जेतेपदाला गवसणी घातली होती. यानंतर कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या जागी विश्वचषकात खेळवायला हवे, या चर्चेला उत आला होता. पण माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांचे मत मात्र वेगळे आहे.
निदाहास ट्रॉफीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीसह धोनीलाही विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेसाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांची निवड करण्यात आली होती. पंतला या स्पर्धेत दोन सामन्यात खेळवण्यात आले, पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. कार्तिकने अखेरच्या सामन्यामध्ये जी भन्नाट खेळी साकारली त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. या चाहत्यांनी आता कार्तिकची तुलना धोनीशी करायला सुरुवात केली आहे. काही जणांनी तर आगामी 2019 च्या विश्वचषकात धोनीऐवजी कार्तिकला संधी द्यावी, असेही म्हटले आहे.
कार्तिकचे चाहते जे विश्वचषकाबद्दल वक्तव्य करत आहेत, त्याबद्दल पाटील म्हणाले की, " कार्तिक आता संघात स्थिरस्थावर होताना दिसत आहे. पण धोनीसारखा अनुभव संघात कुणाकडे नाही. त्याचबरोबर विश्वचषकासाठी धोनीला मी फक्त यष्टीरक्षक म्हणून नाही तर एक फलंदाज म्हणूनही संघात पाहू इच्छितो. "
कार्तिकलाही आपली तुलना धोनीशी होऊ नये, असेच वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच आपली तुलना धोनीशी करू नका, असे कार्तिक म्हणाला होता. दुसरीकडे कोहलीलाही धोनी विश्वचषकाच्या संघात असावा, असे वाटत आहे.